मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

माटलवाडी युवा प्रतिष्ठान कुडली यांच्याकडून कुडली नं. ३ शाळेला खुर्च्यांची भेट

आबलोली (संदेश कदम) : गेली दहा वर्षे गुहागर तालुक्यातील कुडली गावातील माटलवाडी युवा प्रतिष्ठान शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांचे फार मोठे संघटन कुडली माटलवाडी गावामध्ये कार्यरत आहे. या माटलवाडी युवा प्रतिष्ठानकडून दरवर्षी शाळेला विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. गेल्या वर्षी शाळेला साऊंड सिस्टिम आणि दोन फॅन भेट देण्यात आले होते. यावर्षीही कुडली माटलवाडी शाळा नं. ३ या शाळेला विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला बसण्यासाठी ४० खुर्च्यांची देणगी देण्यात आली.

या शाळेचा भौतिक विकास होण्यासाठी मोलाचे सहकार्य माटलवाडी युवा प्रतिष्ठानमार्फत केले जाते. जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे माजी विद्यार्थ्यांचे संघटन म्हणून ओळखले जाणारी माटलवाडी युवा प्रतिष्ठान गावाच्या व शाळेच्या विकासासाठी कायम तत्पर आहे. शाळेने यावर्षी सुमारे १३ लाख रुपयांचा विक्रमी शैक्षणिक उठाव केल्यामुळे व उत्तम कामगिरीबद्दल शाळेतील शिक्षकांचा गौरव युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी या गावचे माजी उपसरपंच व गुरव पांडुरंग पिलाजी थोरसे, गुरव शांताराम थोरसे, पुजारी यशवंत थोरसे, कारभारी आणि ग्रामस्थ तसेच माटलवाडी युवा प्रतिष्ठानचे माजी उपाध्यक्ष सचिन थोरसे, सेक्रेटरी मोहन माटल आणि युवा प्रतिष्ठानचे सर्व प्रतिनिधी आणि कार्यकारिणी सभासद, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदेश सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि वर्षभरामध्ये केलेल्या शालेय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन माटल यांनी केले. सचिन थोरसे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!