मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापुरात अवकाळी पावसाची हजेरी

आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ

राजापूर : भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (८ मे) सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान राजापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. राजापुरात आज गुरुवारचा आठवडा बाजार असल्याने बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांचीही पावसामुळे तारांबळ उडाली. दरम्यान तालुक्याच्या अन्य भागातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचीही त्रेधातिरपिट उडाली.

तालुक्याच्या पूर्व भागातील सौंदळ, रायपाटण, पाचल, ओणीसह सर्वच परिसरात गुरुवारी सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर ९.३० च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

गुरुवारी भरणारा आठवडा बाजार पाहता ग्रामीण भागातील ग्रामस्थ अगोटच्या खरेदीसाठी बाजारात दाखल झाले होते. लग्नसराईचा हंगाम असल्याने बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्राहकांसह व्यापारीवर्गाची चांगलीच धावपळ उडाली. आठवडा बाजारातील अनेक व्यापाऱ्यांचा माल पावसाने भिजल्याने त्यांना काही प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आठवडा बाजार परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने ग्राहकांना चिखलातून खरेदी करावी लागली आहे. साधारण अर्धा तास बरसलेल्या या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा पसरला होता. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना समाधान पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!