कर्दे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी दिनेश रुके यांची निवड

आबलोली (संदेश कदम) : दापोली तालुक्यातील कर्दे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दिनेश काशिनाथ रुके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कर्दे ग्रामपंचायतीची ग्रामसभा मकरंद तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात झाली. यावेळी सुरेंद्र माने यांनी दिनेश रुके यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी नियुक्ती व्हावी अशी सूचना मांडली. या सूचनेला प्रशांत पेवेकर यांनी अनुमोदन दिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
सामाजिक कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दापोली तालुका सरचिटणीस असलेले दिनेश रुके यांनी जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा कर्दे या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद सतत ८ वर्ष भुषविले आहे. त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू महेश क्रीडा मंडळ कर्दे, दापोली तालुका समुद्र किनारपट्टी बैलगाडी शर्यत संघटनेचे सचिव, कबड्डी राज्य पंच आणि बौद्धवाडीचे विद्यमान अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, ग्राम पाणीपुरवठा समितीचे माजी सचिव अशा विविध पदांवर ते कार्यरत आहेत.
दिनेश रुके यांची कर्दे गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने दापोली तालुक्यातून तसेच विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर, ग्रामपंचायत अधिकारी संदेश घोगरे, मंडळ अधिकारी शरद सानप, महसूल अधिकारी दीपक पवार यांच्यासह ग्रामपंचायतच्या सदस्यांनी दिनेश रुके यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


