सहकार सप्ताहानिमित्त खारवी समाज नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे विविध शैक्षणिक उपक्रम

रत्नागिरी : खारवी समाज नागरी सहकारी पतसंस्था शाखा पूर्णगड (ता. रत्नागिरी) मार्फत सहकार सप्ताहानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले होते. यात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पूर्णगड नं. १, पूर्णगड खारवीवाडा, गावडे आंबेरे खारवीवाडा, मेर्वी या शाळांनी सहभाग घेतला.

पतसंस्थेने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुणांना वाव देण्यासाठी, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवून एक वेगळा ठसा उमटवला आहे. या उपक्रमाला शाखा पालक वासुदेव वाघे, जयवंत डोर्लेकर, शाखा अधिकारी निखिल आंबेरकर, पर्णिका आंबेरकर, सदिच्छा पावसकर, श्रीमती आडविरकर, हिदायत भाटकर, सुधीर कातळकर, श्री. जाधव, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. पतसंस्थेने राबवलेल्या या उपक्रमाविषयी सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



