चिपळूणमध्ये भाजपतर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानानिमित्ताने व तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.
सेवा पंधरवडा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरात नशामुक्ती भारत अभियानाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्याच अनुषंगाने भाजपाच्या वतीने चिपळूण येथे जिल्हास्तरीय नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.. ही स्पर्धा दोन गटात होणार असून प्रथम गट हा वय वर्ष १४ ते १८ वर्ष असेल, तर दुसरा गट हा वय वर्ष १८ पासून पुढे खुला असेल. ही नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धा २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६:३० ते १०:३० या वेळेत होणार आहे.
या नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेचे अंतर ३ कि.मी. आणि ५ कि.मी अशा दोन टप्प्यांमध्ये असणार आहे. या स्पर्धेच्या प्रथम टप्प्याचा मार्ग इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिंचनाका बाजारपेठ बाजारपूल येथून पुन्हा त्याच मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे समाप्त होईल. तर दुसऱ्या टप्प्याचा मार्ग इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिंचनाका बाजारपेठ – बाजारपूल -गोवळकोट कमानी येथून पुन्हा त्याच मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे समाप्त होईल.
नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक काढणाऱ्या स्पर्धकांना विजेते घोषित केले जाईल. प्रथम गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम ५ हजार, ४ हजार आणि ३ हजार रुपये तसेच प्रत्येकी मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. त्याचप्रमाणे चौथा ते आठव्या क्रमांकाला अनुक्रमे रोख रक्कम २ हजार, १ हजार, ५००, ३००, २०० रुपये आणि प्रत्येकी मेडल देऊन सन्मानित केले जाईल.
तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल व आकर्षक टी शर्ट देऊन सन्मानित केले जाईल. ही स्पर्धा विद्यार्थी व विद्यार्थिनी अशा दोन स्वतंत्र गटात होणार आहे.
खुल्या गटात महिला व पुरुष अश्या दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम पाच क्रमांक विजेत्यांना रोख रक्कम १० हजार, ७५०० रुपये, ५ हजार रुपये आणि प्रत्येकी मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह दिले जाईल. तसेच चौथ्या क्रमांकाला २५०० रुपये व मेडल व पाचव्या क्रमांकाला रोख रक्कम १ हजार रुपये व मेडल देऊन सन्मानित केले जाईल.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतीश मोरे, भाजप नेते प्रशांत यादव,विक्रम जैन, अमित केतकर, दत्ताराम नार्वेकर, अभय भाटकर, उदय घाग, मंदार खंडकर, प्रणाली सावर्डेकर, विनोद भुरण, शशिकांत मोदी आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघर्ष क्रीडा मंडळ, मंगेश तांबे, सचिन कदम, मुन्ना कदम, भाऊ कदम, मंदार कानपडे, रमण डांगे आदी सहकार्य करीत आहेत. या नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेमध्ये विद्यालयातील / महाविद्यालयातीलतसेच खुला गट मध्ये पुरुष महिला यांनी भाग घ्यावा, असे आवाहन आयोजक यांनी केले आहे.



