कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

साने गुरुजींच्या विचारांचे वारस डॉ. महेंद्र मोहन माझे सहोदर : डॉ. सुनीलकुमार लवटे

डॉ. महेंद्र मोहन अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात संपन्न

कणकवली : “सध्याचा काळ हा खांदेकरी शोधण्याचा काळ आहे. आपल्या विचारांची माणसंच आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या सोबत असतात. डॉ. महेंद्र मोहन यांनी कोणत्याही स्वार्थाच्या पुढे जाऊन एक नवा मनुष्य समाज निर्माण केलेला आहे. जेव्हा आपण भारतीय म्हणून एकमेकांकडे बघायला लागू तेव्हा खऱ्या अर्थाने भारत महान होईल. डॉ. महेंद्र मोहन आणि त्यांचा परिवार हा शिवाजी महाराजांचा रक्ताने, जातीने नाही तर कर्माने वारस आहे. डॉक्टरांचं आणि माझं नातं हे कर्मानं निर्माण झालेलं नातं आहे त्यामुळेच साने गुरुजींच्या मानवताधर्माच्या विचारांचे वारस असणारे डॉ. महेंद्र मोहन हे माझे सहोदर आहेत,” अशा भावना डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केल्या.

ओणी (ता. राजापूर) येथे ‘वात्सल्य मंदिर’ उभारून हजारो अनाथ मुलांचा बाप झालेले, आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करणारे डॉ. महेंद्र मोहन यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार लवटे उपस्थित होते.

साधारणतः ५० वर्षांपूर्वी मुंबईतील सुखासीन आयुष्य सोडून डॉ. महेंद्र मोहन यांनी तळकोकणातील सामाजिक कामाशी आपली नाळ जोडली. मातृमंदिर (देवरुख) मधून त्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि आता ओणी येथील वात्सल्य मंदिर ‘गोकुळ’ येथे त्यांनी आपले कार्यक्षेत्र निर्माण केले. समाजवादी विचारसरणी सोबत ते अनाथांचा आधारवड बनले. समाजवादी विचारांचे सच्चे पाईक आणि राष्ट्र सेवा दलाच्या या कृतिशील प्रचारकर्त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या सोबत काम करणाऱ्या आणि त्यांच्या छत्रछायेत वाढलेल्या व्यक्तींमार्फत डॉ. महेंद्र मोहन अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन ओणी येथील श्री साई विमलेश्वर मंगल कार्यालय येथे १४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी डॉ. महेंद्र मोहन यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचे सहकारी तसेच त्यांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या ‘गोकुळ’ मधील मुलांनी डॉक्टरांविषयी लिहिलेल्या लेखांचे ‘दीपस्तंभ’ या गौरवग्रंथ रूपात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यासोबतच वात्सल्य मंदिरच्या कार्यकारिणी सदस्य देवगोजी यांनी घेतलेल्या दीर्घ मुलाखतीचेही विशेषांकाच्या रूपाने प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. महेंद्र मोहन यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या मानपत्राचे वाचन कवी शशिकांत मुग्धापुरे यांनी केले.

यावेळी कमल-मोहन ट्रस्ट मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती यशस्वी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. यानंतर आदिती जावडेकर, मनीषा मठकर, प्रतीक्षा नमसरे या माजी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींनी आपले भावनिक मनोगत व्यक्त केले. यात कमल- मोहन ट्रस्ट आणि डॉ. महेंद्र मोहन यांच्या पाठिंब्यामुळे आणि सहकार्याने आपण कसे घडलो हे सांगितले.

डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी डॉ. महेंद्र मोहन यांच्या कार्याचे कौतुक करत डॉक्टरांनी कोकण हा भारताचा आदर्श भूप्रदेश निर्माण केला, असे कौतुकोद्गार काढले. डॉ. महेंद्र मोहन यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आपण साऱ्यांनी डॉक्टरांचा वसा घेऊन चालणे हा आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

या सोहळ्याला नर्मदा आंदोलनाच्या नेत्या आणि देशभरात सुरु असलेल्या जनआंदोलनाच्या मार्गदर्शक मेधा पाटकर यांनी ऑडिओद्वारे आपल्या शुभेच्छा दिल्या. डॉ. महेंद्र मोहन यांनी ओणी येथे अनाथाश्रम उभारून सामाजिक क्रांतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. दरवर्षी विविध कार्यक्रम आणि शिबिरं यामधून संविधानातली, साने गुरुजींची पुरोगामी विचारधारा मुलांमध्ये रुजविण्याचे काम केलेले आहे. समाजातील वंचितांचे, आदिवासींचे अनेक प्रश्न त्यांनी हाताळलेले आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये पुरोगामी समता आणि न्यायाच्या दिशने चालणारी युवा सेना उभी करण्याचे आव्हान त्यांनी पेलले असून यापुढेही त्यांचे कार्य चालू राहावे, असे म्हणत त्यांनी डॉक्टरांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. डॉ. महेंद्र मोहन यांची नात आभा गुजर हिने आपल्या आजोबांविषयीचे आपले भावनिक मनोगत व्यक्त करत आजोबा म्हणजे माझ्यासाठी खरे हिरो आहेत असे सांगितले. यानंतर डॉ. मंदिरा बसाक यांनी आपले मामा डॉ. महेंद्र मोहन यांच्याविषयीच्या आपल्या आठवणी व्यक्त केल्या.

डॉ. महेंद्र मोहन यांचे मित्र पत्रकार शिरीष दामले यांनी आपल्या भावना व्यक्त करत डॉक्टरांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. वात्सल्य मंदिर यामधील मुलांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. गॉडफ्री फर्नांडिस यांनी आपले विचार व्यक्त करत डॉक्टरांचे त्यांच्या जीवनात असणारे स्थान व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते अभिजित हेगशेट्ये यांनी आपले विचार व्यक्त करताना डॉक्टर म्हणजे साने गुरुजींच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाणारा सेवा दल सैनिक असे म्हणत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टरांचे मित्र चंदूभाई देशपांडे यांच्याही शुभेच्छा संदेशांचे वाचन यावेळी करण्यात आले. यावेळी डॉ. महेंद्र मोहन यांचे भाऊ देविकाका यांनी आपले विचार व्यक्त करत आपल्यावर लहानपणी आईवडिलांचे संस्कार कसे झाले आणि त्या संस्कारांमुळे आपण कसे घडलो ते सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. सुरेश जोशी यांनी डॉ. महेंद्र मोहन म्हणजे ‘व्यासंगाचा डोंगर’ असे म्हणत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. विश्व आज ना उद्या निर्मळ होणार, जातीभेद विरहित होणार ही डॉक्टरांची आशा होती आणि त्या दृष्टीने त्यांनी ओणीमध्ये पहिले पाऊल टाकले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण सर्वांनी त्यांना प्रोत्साहन आणि सहकार्य करणे आवश्यक आहे, असेही प्रा. सुरेश जोशी म्हणाले. डॉ. महेंद्र मोहन यांचे मित्र चंद्रकांत बावकर यांनी डॉक्टरांचे रेखाचित्र त्यांना भेट म्हणून दिले.

यावेळी डॉ. महेंद्र मोहन यांनी आपले विचार व्यक्त केले. माणसाने माणसासाठी जी काही चांगली कामे केलेली असतात आणि त्याचे जे काही चांगले गुण असतात ते म्हणजे देव, या संकल्पनेनुसार मी माझे आदर्श मानत काम केले. त्यानुसार कर्मामध्ये धर्म आणि समोरच्या माणसामध्ये देव बघायला मी शिकलो. माझा धर्म मानवधर्म होता. केवळ दवाखान्यात औषध देऊन आजार बरा होणार नाही तर त्यासाठी माणसाच्या मनात असणाऱ्या अंधश्रद्धा आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करायला हव्यात. यानुसार आजपर्यंत काम करत आलो, असे म्हणत या साऱ्या कामात सहकार्य करणाऱ्या साऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी डॉ. महेंद्र मोहन यांच्या पत्नी आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या आशाताई गुजर, त्यांचे भाऊ देवीकाका गुजर, देविकाका यांच्या पत्नी प्रतिभाताई, बहीण खेलनाताई, त्यांचे सुपुत्र आलोक मोहन आणि आलाप मोहन, रीना व वैशाली या सुष्णा, आणि बहुसंख्य माजी विद्यार्थी, सुवर्णा राघव, अण्णा सामंत, सुहास ठाकूर-देसाई, रमेश गवस, सिंधुदुर्ग जिल्हा सेवा दल अध्यक्ष नाईक, ज्येष्ठ सेवादल सैनिक विलास कोळपे, विनय पानवलकर, नाना मुजुमदार, अशोक जाधव, ओणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. तुळसणकर, रवी माने, पत्रकार विश्वजित सत्वसेन, ॲड. शहा, संपादक राजन चव्हाण, कवी शशिकांत मुग्धापुरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली तर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. महेंद्र मोहन यांची ग्रंथतुला करण्यात आली. या ग्रंथतुलामध्ये वापरलेले ग्रंथ विविध संस्थांना भेट स्वरूपात देण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय स्तरावरचे संघटक बाबासाहेब नदाफ यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सरिता पवार यांनी केले तर आभार आलाप मोहन यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!