क्रीडामुख्य बातमी

रत्नागिरीतील ज्येष्ठ क्रीडाप्रेमी बाजीराव तावडे यांचे निधन

रत्नागिरी : मिऱ्या येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आणि चिपळूण शहरातील क्रीडा चळवळीला दिशा देणारे ज्येष्ठ क्रीडाप्रेमी बाजीराव तावडे (वय ६५) यांचे आज (३० सप्टेंबर) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरी-चिपळूण परिसरातील क्रीडाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

तावडे यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत अधिकारी म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली. नोकरीच्या निमित्ताने रत्नागिरीवरून बदली होऊन ते चिपळूण येथे आले आणि याच काळात त्यांनी स्थानिक क्रीडाक्षेत्राला मोलाची साथ दिली. ९० च्या दशकात झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली संयोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. उत्तम यष्टीरक्षक म्हणून त्यांची क्रिकेटमधील ओळख होती. संघटनात्मक काम, नियोजन, खेळाडूंना प्रोत्साहन देणे या क्षेत्रात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.

चिपळूण तालुका कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. क्रिकेटसोबतच कॅरम, हॉलीबॉल आणि इतर खेळांमध्येही त्यांनी खेळाडूंना मदत केली. सुचयअण्णा रेडीज यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री होती. खेळाडूंसाठी ते नेहमीच आधारवड ठरले.

मागील तीन वर्षांपासून ते रत्नागिरीतील त्यांच्या मूळगावी वास्तव्याला होते. आज अचानक श्वास घेण्याचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व जावई असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!