महावॉकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन
‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ चे पोस्टर प्रकाशन

रत्नागिरी : मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आजपासून जलसंधारण सप्ताहाला सुरुवात झाली. २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या “महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर” या उपक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पोस्टरचे प्रकाशन शनिवारी करण्यात आले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जि. प.अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण धनंजय साहुत्रे आदी उपस्थित होते.
राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी करणारे माजी मुख्यमंत्री श्री. सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट, हा आपण संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करत आहोत. आजपासून जलसंधारण सप्ताहाला सुरुवात होत आहे. २१ ऑगस्ट रोजी महावॉकेथॉन होणार आहे. यात रत्नागिरीवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केले.



