मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अन्न व औषध प्रशासनाची गुहागरमध्ये धडक कारवाई

विनापरवाना चिकन सेंटरवर दंडात्मक कारवाईसह व्यवसाय बंदची नोटीस : अद्याप नोंदणी न केलेल्या छोट्या-मोठ्या अन्न व्यवसायिकांनी तात्काळ नोंदणी करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन 

गुहागर (संदेश कदम) : तालुक्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक तपासणी मोहीम सुरू केली असून, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती परदेशी यांच्या पथकाने शुक्रवारी शृंगारतळी येथे एका विनापरवाना चिकन सेंटरवर मोठी कारवाई केली. संबंधित चिकन सेंटरकडे अन्न सुरक्षा परवाना (License) नसल्याचे आढळल्याने श्रीमती परदेशी यांनी त्यांना दंड ठोठावला असून, व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या या कडक कारवाईनंतर संबंधित व्यवसायिकाने आज तातडीने रीतसर नोंदणी करून परवाना काढून घेतला आहे.

या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती परदेशी आणि त्यांच्या पथकाने गुहागर चौपाटीवरील स्नॅक्स सेंटर आणि इतर छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही कसून तपासणी केली. यावेळी व्यवसाय करताना पाळावयाचे स्वच्छतेचे व अन्न सुरक्षेचे नियम विक्रेत्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच शहरातील एका हॉटेलचीही अन्न सुरक्षा मानांकनानुसार तपासणी करण्यात आली.

तालुक्यातील इतर सर्व खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स आणि व्यावसायिक केंद्रांचीही आगामी काळात टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती परदेशी यांनी सांगितले. त्यामुळे गुहागर तालुक्यातील ज्या छोट्या-मोठ्या अन्न व्यवसायिकांनी अद्याप आपली नोंदणी केलेली नाही किंवा परवाना घेतलेला नाही, त्यांनी कोणतीही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तत्काळ आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!