पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ सचिवपदी साहिल आग्रे याची निवड

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाच्या सचिवपदी तृतीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थी साहिल आग्रे याची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी महाविद्यालय विद्यार्थी मंडळाची नियुक्ती मुंबई विद्यापिठाच्या याआधीच्या परिपत्रकानुसार करण्यात आली. या विद्यार्थी मंडळात गतवर्षी गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व महाविद्यालयात नियमित उपस्थित राहून सर्व उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थ्यांना विविध वर्गाच्या प्रमुखपदी तसेच विभागप्रमुख म्हणून नेमण्यात आले. त्यानुसार प्रथम वर्ष कला वर्गप्रतिनिधी वसुंधरा विलास रोहीलकर, प्रथम वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी प्रणय प्रमोद बेटके , द्वितीय वर्ष कला वर्गप्रतिनिधी समीक्षा रमेश भुवड, द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी सामिया मुस्तफा साल्हे, तृतीय वर्ष कला वर्गप्रतिनिधी आदिती अभिजीत कुलकर्णी, तृतीय वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी दीक्षा ज्ञानेश्वर साळवी यांची निवड केली गेली.
महाविद्यालयातील क्रीडा विभाग विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निखील रवींद्र खोचाडे, एनएसएस विभाग प्रतिनिधी म्हणून साहिल दिलीप आग्रे, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी म्हणून रणजित पाष्टे यांची नियुक्ती करण्यात आली. प्राचार्य प्रतिनिधी म्हणून तृतीय वर्ष कला वर्गातील तन्वी अनिल वेद्रे, तर तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील ऋतुजा दिलीप भेकरे यांची नियुक्ती करण्यात आली.
साहिल आग्रे याने विद्यार्थी मंडळ प्रतिनिधी होण्याची इच्छा व्यक्त केली असता अदिती कुलकर्णी हिने त्याच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि वसुंधरा रोहीलकर हिने सर्वानुमते त्याला अनुमोदन दिल्यावर प्राचार्य डॉ. देसाई यांनी साहिल आग्रे याची विद्यार्थी मंडळ सचिवपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.
महाविद्यालय विकासात विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन करताना सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतील यासाठी विद्यार्थी मंडळाने प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी विद्यार्थी मंडळाच्या सचिव तसेच सर्व विद्यार्थी प्रतिनिधीना दिल्या. यासर्व प्रक्रियेत महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता प्रमुख प्रा. लंकेश गजभिये, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, डॉ. दिनेश पारखे आणि डॉ. जालिंदर जाधव सहभागी झाले होते.



