मुख्य बातमी

रत्नागिरी तालुका बारावीच्या निकालात जिल्ह्यात अव्वल

९५.७२ टक्के निकाल : जिल्ह्याचा निकाल ९३.१८ टक्के

रत्नागिरी : कोकण विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रुवारी २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेच्या निकालात रत्नागिरी तालुक्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.१८ टक्के लागला असताना, रत्नागिरी तालुक्याने मात्र ९५.७२ टक्के यश संपादन करून जिल्हास्तरावर आपली आघाडी कायम राखली आहे. यंदाच्या परीक्षेतही रत्नागिरीच्या विद्यार्थिनींनी यशाची परंपरा कायम राखत मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी नोंदवली आहे.

रत्नागिरी तालुक्यातून या परीक्षेसाठी एकूण ३७६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३७४६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. यामध्ये मुलांची संख्या १८४१ तर मुलींची संख्या १९०५ इतकी होती. निकालाच्या आकडेवारीनुसार, तालुक्यातील एकूण ३५८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचा निकाल ९३.८० टक्के लागला असून १७२७ मुले यशस्वी झाली आहेत, तर मुलींच्या यशाची टक्केवारी ९७.५८ इतकी असून १८५९ मुलींनी यशाची मोहोर उमटवली आहे. नोंदणीकृत आणि प्रत्यक्ष परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक आहे. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांनीही यंदा उत्तम कामगिरी केली असून, तालुक्याचा निकाल जिल्ह्याच्या सरासरी निकालापेक्षा अधिक राहिल्याने शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!