आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे जानेवारी २०२५ डेंग्यूचे अवघे ४ रुग्ण : जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव
किटकजन्य रोगनियंत्रण उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यामध्ये वर्षभर कार्यक्रम : मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव

रत्नागिरी : “जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये डेंग्यूचे २५६ रुग्ण आढळले होते. आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे या वर्षी हे प्रमाण कमी होऊन जानेवारी २०२५ पासून ४ रुग्ण आढळून आले आहे,” अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली आहे.
दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांचे सूचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात १६ मे या राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार असून, यानिमित्ताने किटकजन्य रोगनियंत्रण उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यामध्ये वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याबाबत सर्व आरोग्य कर्मचाऱ्याना सूचना दिल्या आहेत.
डेंगी हा विषाणूजन्य आजार, असून तो दूषित एडिस डासाची मादी चावल्याने त्याचा प्रसार होतो. डेंगीचा प्रसाराच्या नियंत्रणासाठी पाण्यातील एडिस डासाची अंडी, आळी, कोष व पुर्ण डास ही वाढ खंडीत केली तरच डेंगी या आजाराचा प्रसार नियंत्रित करता येईल, त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.
किटकजन्य रोगावर प्रतिबंध करणेसाठी कार्यक्षेत्रातील डासांची संख्या कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील डासअळी घनता कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपला परीसर स्वच्छ ठेउन डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे.
कायमस्वरूपपी डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पीमासे सोडणे.
पाणी साठवणुकीची भांडी रिकामी करुन घासून पुसून कोरडी करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे.
गावामध्ये इको फ्रेंडली कार्यक्रमांतर्गत सर्व शौचालयाच्या व्हेंट पाईपला व आऊटलेटला जाळी बसविण्याचा कार्यक्रम घेणे.
परीसरातील प्लास्टीक, टायर्स, भंगार साहित्य इ. निरुपयोगी साहित्यांची विल्हेवाट लावणे.
तुंबलेली गटारे वाहती करणे व डबकी बुजविणे.
या कार्यक्रमासाठी ग्राम आरोग्य पाणी पुरवठा व पोषण समिती यांचे तिमाही सभेमध्ये जनजागृतीबाबत विशेष सूचना देण्यात येऊन जनजागृती करणे.
डासांच्या नियंत्रणासाठी ग्रामपंचयातीने गप्पी मासे पैदास केंद्रे तयार करणे .
नियमित पाणी शुध्दीकरण करण्यात यावे. पाण्यामध्ये योग्य त्या प्रमाणात उत्तम प्रतिच्या टी. सी. एल. पावडरचा वापर करणे. ग्रामस्थांनी पाणी उकळूण गाळून पिणे.
आपल्या कार्यक्षेत्रामध्ये टायर अथवा भंगार व्यावसायीकांनी स्वच्छता पाळणे तसेच पावसाचे पाणी साठू न देणेबाबत सूचित करणे.
पावसाळयात डबक्यांमध्ये पाणी साठून तात्पुरती डासोत्पत्ती स्थाने निर्माण होतात.अशा ठिकाणी भर घालून सदर डासोत्पत्ती स्थान नष्ट करणे अथवा गप्पी मासे सोडणे किंवा आळी नाशकाचा वापर करणे.
संपूर्ण गावाचे सर्व्हेक्षण करून पॅरा कन्टेनर (टायर्स, फुटकी मातीची, प्लॅस्टिकची भांडी) यांची यादी करून ग्रामपंचरायतीमार्फत त्यांची विल्हेवाट लावणे.गावातील शासकीय इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना, खासगी दवाखाने, एस. टी डेपो, रेल्वे स्टेशन या ठिकाणाचे सर्व्हेक्षण करून डासोत्पती स्थाने आहेत का याची नियमित पडताळणी करणे.
नागरिकांनी सहकार्य करून नमूद सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच राबविल्यास आपल्या भागातील डास व आळी घनता कमी होऊन किटकजन्य आजाराचा उद्रेक होणार नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी सांगितले.



