कुंभार्ली जलजीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा व योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी मनसे आक्रमक
१५ दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास मनसे स्टाइलने ठिय्या आंदोलनाचा इशारा

मंडणगड : तालुक्यातील कुंभार्ली जलजीवन योजनेतील दूषित पाणीपुरवठा व गैरव्यवहारप्रकरणी गेली अनेक महिने ग्रामस्थ प्रशासनाकडे दाद मागत आहेत; पण गेंड्याच्या कातडीचे प्रशासन ठेकेदार व सहठेकेदार यांना कायम पाठीशी घालत असून, ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात २८ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थ अधिक संतप्त झाले. “वेळीच ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत पुढील १५ दिवसांत योग्य ती कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कुंभार्ली ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मनसे स्टाइलने ठिय्या आंदोलन करील असा सूचक इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कुंभार्ली जलजीवन योजनेतील दूषित पाणीपुरवठा व गैरव्यवहारप्रकरणी गेली अनेक महिने ग्रामस्थ प्रशासनाकडे दाद मागत आहेत; पण प्रशासन ठेकेदार व सहठेकेदार यांना पाठीशी घालत असून, ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या विरोधात कुंभार्ली ग्रामस्थ यांनी पंचायत समिती मंडणगड कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला होता. याच पार्श्वभूमीवर २७ एप्रिल रोजी मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. जाधव व पोलीस निरीक्षक श्री. गवारे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.

सहठेकेदार तसेच पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. याच अनुषंगाने २८ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयात सकाळी ११ वाजता सभा आयोजित केली होती; परंतु या सभेस ठेकेदार व सहठेकेदार तसेच पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांचा संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
या सभेला मनसे सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत प्रशासन ग्रामस्थांची दिशाभूल करीत जीवाशी खेळ योजना घोषित करण्यासाठी दबाव आणत आहे. ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी संगनमताने योजनेतील निधी लुटत असून योजना कागदावर व जनता वार्यावर अशी स्थितीत आहे. वेळीच ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत पुढील १५ दिवसांत योग्य ती कारवाई न केल्यास मनसे पक्ष कुंभार्ली ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मनसे स्टाइलने ठिय्या आंदोलन करील, असा सूचक इशारा ही यावेळी दिला.
या वेळी कुंभार्ली ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ व महिला मंडळ तसेच कोकण विभागीय संघटक व खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, जिल्हा सचिव सचिन गायकवाड, उपजिल्हा अध्यक्ष संजय आखाडे, मंडणगड तालुकाध्यक्ष नवज्योत सिंग गौड, उप तालुकाध्यक्ष स्वप्नील पवार, मुस्तकिम कारविनकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सह संपर्कप्रमुख सचिन संवादकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जितेंद्र सिंग गौड आदी उपस्थित होते.



