मुख्य बातमी

थिबा कालीन बुद्धविहारासाठी २७ ऑक्टोबरला मोर्चा

थिबा राजा कालीन बुद्धविहार संघर्ष समितीकडून आयोजन : ५ हजार बौद्ध बांधव मोर्चात सहभागी होणार

रत्नागिरी : थिबा कालीन बुद्धविहारासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेत प्रशासनाच्या वतीने होऊ घातलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम प्रक्रिया रद्द करावी तसेच थिबा राजा कालीन बुद्धविहाराची राखीव आरक्षीत ठेवलेली नोंद पूर्ववत करून ती जागा बौद्ध समाजाला मिळावी या मागणीसाठी बौद्ध समाजाकडून रत्नागिरीत २७ ऑक्टोबरला मार्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती थिबा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार व कार्याध्यक्ष अनंत सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी मार्चाविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्याध्यक्ष सावंत यांनी सांगितले की, “२७ ऑक्टोबर रोजी मार्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता थिबा कालीन बुद्धविहार येथे होईल. यानंतर मार्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येईल. मार्चामध्ये सुमारे ५ हजार बौद्ध समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. मार्चाविषयी लोकांमध्ये उत्साह असून गावोगावी चांगला प्रतिसाद मिळत आहे.” सावंत यांनी यावेळी सांगितले की, “थिबाराजा कालीन बुद्धविहार इंग्रज सरकारने थिबाराजा यांच्यासाठी त्यांचे इच्छेनुसार बांधून दिले होते. त्यावेळेपासून रत्नागिरी ही बौद्ध संस्कृतीने पवित्र झालेली भूमी आहे. त्याची देखभाल बौद्ध बांधव नियमितपणे करत आहे. विहाराची अधिक चांगली देखभाल करण्यासाठी व ती जागा मिळवण्यासाठी गेली अनेक वर्षे बौद्ध बांधवांनी प्रयत्न केल्यानंतर थिबा राजा कालीन बुद्ध विहार व त्याखालील जागा एकूण क्षेत्र १७.५० गुंठे प्रशासकीय मोजणी करून सन २०१४ मध्येच बौद्ध बांधवांसाठी राखून ठेवली.”

“बुद्ध विहाराची जागा ही एका विशिष्ठ कारणासाठी राखीव असून त्या जागेत बुद्धविहार अस्तित्वात आहे, याची पूर्ण जाणीव असतानाही त्या जागेत कम्युनिटी सेंटर बांधण्यात येत आहे. थिबा राजा कालीन बुद्ध विहाराची जागा शासनाच्या आदेशानुसार फक्त बुद्ध विहारासाठी राखीव ठेवण्यात आलेली असताना त्या धर्मस्थळाचा अवमान करत त्या जागेचा वापर इतर हेतूसाठी केला जात आहे. अशा प्रकारे आरक्षित क्षेत्रामध्ये कम्युनिटी सेंटर बांधण्यास दिलेली परवानगी म्हणजेच बौद्ध समाजावर केलेला अन्याय आहे,” असे ते म्हणाले.

आरक्षित जागेत होऊ घातलेले कम्युनिटी सेंटर हेच बुद्धविहार आहे असे संबोधून बौद्ध समाजाची प्रशासनाकडून फसवणूक केली जात आहे. कम्युनिटी सेंटरसाठी बौद्ध समाजाचा विरोध नाही; मात्र ते या ऐतिहासिक व विशिष्ठ कारणासाठी राखून ठेवलेल्या व ऐतिहासिक बुद्ध विहारासाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये नको. त्यामुळे प्रशासनाच्या या समाज विरोधी धोरणामुळे समाजात असंतोष निर्माण झाला आहे. लोकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहचाव्यात यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला थिबा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष किशोर पवार, प्रकाश पवार, सल्लागार सुनील आंबुलकर, दीपक जाधव, सहसचिव रुपेश कांबळे, प्रसिद्धी प्रमुख केतन पवार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!