मुख्य बातमी

श्री विठ्ठल मंदिर परिसर विकास आणि सुशोभीकरण कामाचा शुभारंभ

रत्नागिरी : प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीच्या श्री विठ्ठल मंदिर परिसर सुशोभीकरण आणि विकास या भव्य दिव्य कामाचा शुभारंभ उद्या (२७ ऑक्टोबर) सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या सुशोभीकरण कामासाठी पालकमंत्र्यांनी यापूर्वीच तीन कोटी रुपये विशेष निधी म्हणून नगरपालिकेकडून मंजूर करून दिले आहे. मध्यंतरी पावसाळी ऋतूमुळे या कामाची सुरुवात थांबली होती; मात्र आता महाराष्ट्रातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरीच्या या मंदिराला फार मोठी सामाजिक आणि धार्मिक अशी परंपरा असल्यामुळे सर्वांनाच हा आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

या मंदिराला स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रिटिश सरकारने सनद सुरू केली आहे. ब्रम्हदेशचे राजे थिबा यांनी रत्नागिरीमध्ये वास्तव्याला असताना या मंदिराला भेट देऊन आपल्या राजघराण्यातील एक सुंदर असा आरसा भेट दिला आहे. अजूनही तो मंदिराने व्यवस्थित जतन केला आहे. महसुली गाव राहाटागरची निर्मिती झाली, तिची सुरुवात या मंदिराच्या चतु:सीमा निश्चित करून झाली असल्यामुळे या जागेला क्रमांक एकने नोंदण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिराचा अनेक नेतेमंडळींनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व्यासपीठ म्हणून उपयोगही केला आहे.

अशा या दैदिप्यमान प्रति पंढरपूरचा नव्याने साज चढवून भाविकांना, भक्तांना आणि पर्यटकांनाही या मंदिरात भेट देण्याची एकप्रकारे नव्याने संधी प्राप्त व्हावी तसेच जागतिक नकाशावर प्रति पंढरपूरची नव्याने ओळख निर्माण व्हावी, या हेतूने या मंदिराचे सुशोभीकरण आणि विकास करण्याचे निश्चित केले आहे.

सोमवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मंदिर परिसरात असंख्य नागरिक, भक्तमंडळी, विविध समाजातील नामवंत मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे. यावेळी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्था रत्नागिरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!