मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

ठेकेदाराने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकवल्याने राजापूर न.प. कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

राजापूर : नगर पालिकेने कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या कर्मचार्‍यांचे वेतन VDKया ठेकेदार कंपनीने थकविल्याने व शासनाकडून दिलेल्या परीपत्रकात देण्यात आलेली कर्मचार्‍यांच्या वेतनाची रक्कम आणि ठेकेदार कंपनी कर्मचार्‍याना देत असलेल्या वेतनाची रक्कम यामध्ये खूप मोठी तफावत असल्याने संबंधित ठेकेदार कपंनीच्या विरोधात पालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी आजपासून (१५ एप्रिल) बेमुदत संप सुरू केला असून, अशा आशयाचे पत्र न. प. प्रशासनामार्फत ठेकेदार कंपनीला दिले आहे.

राजापूर नगर पालिकेमध्ये VDK या ठेकेदार कंपनीच्या अंतर्गत सफाई कर्मचारी, बांधकाम कर्मचारी, व डाटा ऑपरेटर या पदावर काम करीत आहेत; परंतु या कर्मचार्‍यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन दिले जात नाही. तसेच किमान वेतनाच्या अर्ध्या पेक्षा कमी वेतन देण्यात येते. ते देखील कर्मचार्‍यांकडून कंपनीच्या सुपरवायझरला वारंवार फोन करुन वेतनाची मागणी करून देखील वेळेत मिळत नसल्याचे उपोषणाला बसलेल्या कर्मचार्‍यांनी पत्रकारांकडे बोलताना सांगितले.

एका कर्मचार्‍याला सर्व भत्ते मिळून २२ ते २३ हजारापर्यंत किमान वेतन दिले जात असून प्रत्यक्षात मात्र अर्ध्याहून कमी वेतन कंपनीकडून कर्मचार्‍यांना दिले जात असल्याचे उपोषणकर्त्या कर्मचार्‍यांनी सांगितले. तसेच पालिका प्रशासनाकडून अधिक माहिती घेतली असता कंत्राटी कर्मचार्‍यांच्या हजेरी पटावर ४८ कर्मचारी असून प्रत्यक्षात मात्र ३९ कर्मचारी राजापूर पालिकेत कार्यरत असून उर्वरीत कर्मचारी आहेत कुठे? की ठेकेदार कंपनीकडून त्या कर्मचार्‍यांच्या नावावर शासनाकडून पैसे उकळले जात आहेत की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शासनाकडून सर्व भत्त्यासहीत एवढी रक्कम कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी कंपनीला दिली जात असेल तर संबंधित ठेकेदार कंपनी अर्ध्याहून कमी वेतन देऊन कंत्राटी कर्मचार्‍यांची फसवणूक करत आहे, असे बोलले जात आहे. यामुळे या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असून बँकेचे हप्ते व इतर कोणाकडून उसने घेतलेले पैसे त्यांना व्याजासहीत परतफेड करणे कठीण झाले असून न.प. च्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी VDK या ठेकेदार कंपनीच्या विरोधात १५ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तसेच जोपर्यंत शासनाकडून दिले जाणारे पूर्ण वेतन कंपनीकडून दिले जात नाही व तोपर्यंत संप सुरूच रहाणार असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!