मुख्य बातमी

गणपतीपुळे समुद्रात तरुणाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढले गेल्याने एका १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मालगुंड येथील समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला.

जयगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निखिल शिवाजी वाघमारे (वय १८, रा. केशवनगर, मुंडवा, पुणे) हा तरुण २४ ऑक्टोबर रोजी गणपतीपुळे येथे आला होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तो गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरला होता.

पोहत असताना समुद्रात आलेल्या एका मोठ्या लाटेमुळे निखिल वाघमारे खोल पाण्यात ओढला गेला आणि बेपत्ता झाला. त्याच्या शोधासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह मालगुंड येथील सागर दर्शन रिसॉर्टच्या पाठीमागील समुद्रकिनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत मिळून आला.

स्थानिकांनी तातडीने निखिलला उपचारासाठी वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर जयगड पोलीस ठाण्यात २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११.१२ वाजता अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम १९४ प्रमाणे ही घटना नोंदवून पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत. गणपतीपुळे समुद्रात पोहताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!