रत्नागिरीत एनसीसीचा ‘नॅशनल स्वराज्य मेळा’
राज्यभरातील ६० कॅडेट्स घेणार सागरी किनाऱ्यावर प्रशिक्षण

रत्नागिरी : २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीतर्फे ‘नॅशनल स्वराज्य मेळा’ या राष्ट्रीय स्तरावरील वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. या शिबिरात महाराष्ट्रातून ६० राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुला-मुलींचा सहभाग असणार आहे.
हे महत्त्वाकांक्षी शिबिर १० नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या बारा दिवसांच्या कालावधीसाठी रत्नागिरी येथे होणार आहे. या शिबिरासाठी येणारे कॅडेट्स रत्नागिरीसह पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख विभागांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. शिबिराची सुरुवात रत्नागिरीतून होईल. रनपार, पावस, पूर्णगड, आंबोळगढ, जैतापूर ठिकाण विजयदुर्ग आणि परत याच त्याच मार्गाने रत्नागिरीत हे शिबिर होईल.

या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट कॅडेट्सना विविध सागरी आणि नौदल संबंधित उपक्रमांद्वारे प्रशिक्षित करणे आहे हा आहे. या शिबिरादरम्यान विविध उपक्रम करण्यात येणार असून, स्वच्छतेबाबत जनजागृती अभियान “स्वच्छ कोकण, समुद्र कोकण, सुंदर कोकण” यावर आधारित पथनाट्यातून राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटमार्फत सागरी किनारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे व तसेच रॅपलिंग, ट्रेकिंग, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, नाथनाट्य असे विविध उपक्रम होणार आहेत.

या कॅम्पमध्ये २ भारतीय नौसेना अधिकारी, २ एनसीसी अधिकारी, २ गर्ल्स कॅडेट इन्सक्टर, १ नौका प्रतिमान निर्देशक, ११ भारतीय नौसेना कर्मचारी, १ आर्मी वैद्यकीय कर्मचारी, ८ राज्य शासकीय कर्मचारी स्टाफ व राष्ट्रीय छात्र सेनाचे ३० मुले व ३० मुलींचा सहभाग होणार आहे.
या शिबिराचे पूर्व प्रशिक्षण म्हणून प्रि मेनु कॅम्प २४ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत कार्यालयाकडून यशस्वीरित्या संपन्न होत असून, यात एकूण १२० राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुला व मुलींचा सहभाग आहे. यामधून पुढील शिबिरासाठी ६० मुला व मुलींची निवड केली जात आहे. तसेच या शिबिरामध्ये सागरी प्रशिक्षण शिडांच्या नौकांचे प्रशिक्षण तसेच सरवायवल सागरी बचाव प्रशिक्षण देण्यात आले.


