शेती पाठोपाठ मच्छी व्यवसायाला वादळी पावसाचा फटका
रत्नागिरी जिल्ह्यातील कोट्यवधींची उलाढाल थांबली

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोट्यवधींची उलाढाल असलेला मच्छी व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘मोंथा’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे मच्छी व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आवक कमी झाल्याने मच्छीचे दर ही चांगलेच वधारले आहेत. यामुळे खवैय्ये देखील नाराज झाले आहेत. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. कोकणातील बहुतांश मासेमारी व्यावसाय ठप्प झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
मुंबईच्या हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला असून जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने समुद्र देखील खवळलेला आहे. परिणामी, रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच भागांत गेल्या काही दिवसांपासून मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सतत पडणाऱ्या या पावसाने भात शेतीबरोबर इतर पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने कोकणातील शेतकरी हवालदील झाला आहे; मात्र आता या पावसाचा फटका मच्छी व्यावसायाला देखील बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, जयगड, गुहागर, दापोली व राजापूर येथील मच्छीमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मच्छी व्यावसायाला पावसाने पुन्हा ब्रेक लावला आहे. यामुळे जिल्ह्यातील मच्छी व्यावसायातून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल पूर्णत: थांबली आहे.
गणपती उत्सवानंतर तेजीत सुरू झालेला मच्छी व्यवसाय थांबल्याने मच्छी व्यवसायिकांना आपल्या बोटी बंदरात नांगरुन ठेवाव्या लागल्या आहेत. मच्छीमारी थांबल्याने माशांचे बाजारातील दर ही गगनाला भिडले आहेत. ३०० ते ४०० रुपयांना मिळणारी सूरमई आता ८०० रुपयांच्या पुढे गेल्याने खवैय्ये चांगलेच नाराज झाले आहेत. तसेच पापलेट, हलवा, बांगडा, कोळंबी या सारख्या माशांच्या दराने ५०० रुपयांचा टप्पा पार केल्याने खवैय्यांना आता आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करणे अवघड झाले आहे. शेत पिकांपाठोपाठ आता मच्छी व्यवसायाला पावसाचा फटका बसल्याने मच्छी व्यावसायिकांना कामगारांचे पगार काढणे व घर चालविणे देखील अवघड झाले आहे.
“मच्छी व्यवसायाला या वादळामुळे आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे. पावसाळ्यानंतर मासेमारीसाठी बोटी तयार करण्याचा खर्च ही अजून सुटलेला नाही. त्यात आम्ही आणखी आर्थिक संकटात सापडलो आहोत. वादळी पाऊस लवकरच जाऊन पुन्हा मच्छी व्यवसाय सुरू होण्याची आशा लागून राहिली आहे. हा पाऊस व वादळ जाण्याची वाट बघण्याशिवाय आमच्याकडे कोणताच पर्याय नाही.”
– शरिफ मजगांवकर, मच्छी व्यावसायिक, रत्नागिरी


