खेरशेत येथे यशोधरा महिला मंडळाच्या वतीने संविधान दिन साजरा

आबलोली (संदेश कदम) : भारतीय संविधानाला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण झाली असून, यानिमित्त खेरशेत (ता. चिपळूण) येथील यशोधरा महिला मंडळाच्या वतीने खेरशेत येथील तक्षशिला बुद्धविहारात संविधान सन्मान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महिला मंडळाच्या अध्यक्षा उपासिका शैला बाळाजी कदम यांनी, तर भारतीय संविधानाच्या प्रतिमेला ज्येष्ठ उपासिका जयश्री कदम यांनी पुष्पहार अर्पण करून समाजाप्रती आदरांजली वाहिली. याप्रसंगी उपासिका मनाली कदम (आशा सेविका) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाचे महत्त्व विषद केले. त्यानंतर उपासिका संघरक्षिता कदम (अंगणवाडी सेविका) यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन केले.
या कार्यक्रमासाठी उपासिका प्रज्ञा कदम (उपाध्यक्षा), करुणा कदम (संदेश वाहक), अनिता कदम, प्रियांका कदम, प्रार्थना मोहिते, मंदा कासारे, प्रणाली कदम, वैशाली कदम आणि सृष्टी कदम यांनी अथक परिश्रम घेतले.


