पटवर्धन हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात संपन्न

रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. कार्यक्रमाची सुरुवात ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संविधान गीताने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रा. प्रकाश नाईक यांचा परिचय अजित मुळीक यांनी करून दिला.

यानंतर प्रा. नाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी संविधान विषयक उद्बोधक व विचारप्रवर्तक व्याख्यान दिले. इंग्रजांच्या कालखंडात महिलांसंदर्भात झालेल्या महत्त्वपूर्ण कायद्यांचा आणि आधुनिक भारतीय संविधानाच्या निर्मितीचा ऐतिहासिक संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व व मूलभूत तत्त्व समजावून सांगितले.

भारतीय संविधान कोणत्याही एका धर्माचे, जातीचे किंवा व्यक्तीचे नसून संपूर्ण भारतीय जनतेचे आहे, हे त्यांनी अतिशय प्रभावी शब्दांत स्पष्ट केले.
प्रमुख वक्त्यांच्या व्याख्यानानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा जानकी घाटविलकर यांनी आपल्या मनोगतामध्ये संविधान मूल्यांचे शिक्षणातून संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
संविधान दिनाच्या आजच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पालक प्रतिनिधी तुषार जाधव, अमित जाधव तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षक संदीप कांबळे व इतर अध्यापक वर्ग उपस्थित होता.

संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, कर्तव्याची जाणीव आणि राष्ट्रनिष्ठा जागविणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुनीता गाडगीळ यांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक अमर लवंदे यांनी केले.



