हिंदू धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी व्हा : गोविंद भारद्वाज

राजापूर : छत्रपती शिवरायांचे मावळे बनून हिंदू धर्मरक्षणासाठी या कार्यात सहभागी झाले पाहिजे. त्यामुळे हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील आपल्याला सहभागाचा आनंदही घेता येईल, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे गोविंद भारद्वाज यांनी केले.
हिंदू जनजागृती समितीच्या मोहिमेला रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि देवरुख येथील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ही मोहीम रत्नदुर्ग किल्ल्यावर २३ नोव्हेंबर सकाळी ९ वाजता सुरू झाली. यामध्ये सुमारे ८० धर्मप्रेमी सहभागी झाले होते. किल्ल्याच्या महाद्वाराजवळ असलेल्या हनुमंत मंदिरात दर्शन घेऊन मोहिमेला सुरुवात केली. यामध्ये गडाची स्वच्छता करून गडाची पाहणी केल्यानंतर शौर्य प्रशिक्षण घेण्यात आले.
राष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी आपण कसे प्रयत्न करू शकतो तसेच राष्ट्र आणि धर्मावर होणारे आघात आणि त्यावरील उपाययोजना या विषयी हिंदू जनजागृती समितीचे श्री. भारद्वाज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सानिध्यात या. कालमहात्म्या नुसार हिंदुराष्ट्राची स्थापना होणार आहे, असे संत सांगतात. मात्र या कार्यात धर्मप्रेमी युवकांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे साधना म्हणून सहभागी झाल्यास आपले जीवन ही सार्थकी लागेल, असे ते म्हणाले.
या मोहिमेत स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गातील युवा आणि समितीच्या कार्यात सहभागी असणारे धर्मप्रेमी तसेच गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग संपर्क प्रमुख तन्मय जाधव, शिवनिष्ठा प्रतिष्ठान कोल्हापूर विभागाचे कार्यकर्ते पाचल येथील प्रभाकर सुतार आणि पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे येथील सतीश कुंभोजकर हे सहभागी झाले होते.



