भरणे येथे लक्झरी बसला पाठीमागून मोटारीची धडक
पाच गंभीर : महामार्गावर वाहतूक ठप्प

खेड : मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे नाकानजीक आराम बसला मोटारीची पाठीमागून धडक आणून अपघात झाला. हा अपघात आज (९ मे) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झाला.
मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बस भरणे नाका येथे प्रवासी उतरविण्यासाठी थांबली असताना मुंबईहून संगमेश्वरकडे मोटारीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात मोटारीतील पाजजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. या अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे (वय ४८), शिल्पा परशुराम खेराडे (५०), जनार्दन खेराडे (४०), परशुराम गुणाजी खेराडे (६०, सर्व रा. संगमेश्वर) आणि अर्जुन धोंडीबा चाळके (वय ३०, रा. सातारा) हे पाजजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व अपघातग्रस्तांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आले, तर परशुराम खेराडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विनय तोडणकर, संतोष नलावडे, विवेक गांधी, परवेज मणियार यांच्यासह भरणे येथील स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक यांच्या मदतीने खेड पोलिसांनी सर्व अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले. या अपघातामुळे महामार्गावर तब्बल अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती.
दरम्यान, या अपघातात मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोटारीतील सिलेंडरचा टॅक गाडीच्या पुढील सीटवर आला होता. जर तो फुटला असता तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती.



