रत्नागिरीत ६ डिसेंबरला तालुकास्तरीय साहित्य संमेलन
परिसंवादात दुर्गेश आखाडे, प्रकाश सावंत, अमेय धोपटकर, हरीष सामंत यांचा सहभाग

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ आणि स्वर्गीय आमदार कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (६ डिसेंबर) शहरातील साळवी स्टॉप येथील माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात रत्नागिरी तालुकास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात “असे घडलो आम्ही” हा परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात साहित्यिक दुर्गेश आखाडे, प्रकाश सावंत, अमेय धोपटकर आणि हरीष सामंत सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे यांनी दिली.
६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रंथ दिंडी निघणार आहे. त्यानंतर १० वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सागर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष रवींद्र सामंत, संमेलनाध्यक्ष सुनेत्रा जोशी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता “असे घडलो आम्ही” हा परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात साहित्यिक प्रकाश सावंत, दुर्गेश आखाडे, अमेय धोपटकर आणि हरीष सामंत सहभागी होणार आहेत. दुपारी २ वाजता “साहित्यिक, ग्रंथालय आणि वाचन चळवळ” याविषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये माजी शिक्षक नथुराम देवळेकर, विनायक हातखंबकर साहित्यिक दीपक नागवेकर, पत्रकार मनोज मुळ्ये सहभागी होणार आहेत. दुपारी ३.३० वाजता कवीसंमेलन होणार आहे. त्यानंतर साहित्य संमेलनाचा समारोप होणार असल्याचे श्री. साबणे यांनी सांगितले.


