घरडा कॉलेजच्या प्रा. सौ. सोनाली जाधव यांची पीएचडी पूर्ण; कसबा परिसरातून कौतुकाचा वर्षाव

चिपळूण : येथील नामांकित घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (GIT) मधील केमिकल (रसायनशास्त्र) विभागातील प्राध्यापिका सौ. सोनाली प्रवीण जाधव यांनी मुंबई येथील विख्यात ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (ICT) मधून रसायनशास्त्र विषयात आपली पीएच्.डी. (Ph.D.) पदवी यशस्वीरी्या पूर्ण केली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण परिसरातून आणि शैक्षणिक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. डॉ. सोनाली जाधव यांनी केमिकल कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यावर (Waste Water Treatment) प्रक्रिया करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. कंपन्यांमधून सोडले जाणारे पाणी जलचरांना व एकूणच जीवसृष्टीला घातक ठरणार नाही, या दृष्टीने त्यांनी हे संशोधन केले आहे. हे संशोधन केमिकल कंपन्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे आहे.
त्यांच्या या संशोधन कालावधीत त्यांचे अनेक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध (Research Papers) देखील नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. या संपूर्ण संशोधन कार्यासाठी त्यांना प्रा. डॉ. गोगटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कसबा परिसरात आनंदाचे वातावरण
प्रा. डॉ. सोनाली जाधव या मूळच्या कसबा बौद्धवाडी येथील माजी तालुका शिक्षक नाना जाधव यांच्या सूनबाई व प्रा. डॉ. प्रवीण जाधव यांच्या सुविद्य पत्नी आहेत. ग्रामीण भागातील एका सुनेने शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या या सर्वोच्च बहुमानाबद्दल कसबा आणि संपूर्ण परिसरातून त्यांचे विशेष कौतुक केले जात असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.



