
रत्नागिरी : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात चक्री वळणावर खासगी ट्रॅव्हल्स ७० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज (५ डिसेंबर) पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. नेपाळी कामगारांना रत्नागिरीमध्ये घेऊन येत असताना हा अपघात झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही; मात्र या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले आहेत.
किरकोळ दुखापत झालेल्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास चालू आहे. बसमध्ये अंदाजे ९५ प्रवासी असल्याचे समजते.
पोलीस नियंत्रण कक्षाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, आज पहाटे कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट (ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) येथे खासगी ट्रॅव्हल (एमपी १३ पी १३७१) बस रत्नागिरी कडे येत असताना दरीत कोसळून अपघात झाला असून, या घटनेत १८ प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी व सखरपा PHC येथे दाखल करण्यात आलेले आहे.


अपघातात तत्काळ जखमी रुग्णांना उपचारासाठी नेण्यात आले यामध्ये डेलीयन चौधरी (वय २८), सुनील चौधरी (३१), खुशीराम (३९), जीवन परिवार (२०), नीरजल (२४), देबा बी के (६०), गिरसिंग धामी (५०), मुलयम सिंग (३३), देवमा धामी (४८), जसबीर थापा (४७), चंपा थापा (४७), इकमन नेपाली (२२), वीर बहाद्दूर मगर (४४), दमर ठाकूर (३९), वीरेंद्र सिंग तोमर (४८), तोयनाथ खामे (४५), सहनील (दीड वर्ष), गीता मगर (५०), ग्यानबार मगर (५२), बीर बहादूर मगर (६७), शेर सारथी (५०), बांडू ठारू (७०), तेज ठाकूर (५२), भागीराम चौधरी (३६), किशोर ठारू (३५), राम बहादूर (७५), ईश्वर चौधरी (४०), नारायण गिरी (६०), काळसु चौधरी (५५) असे जखमी झालेल्यांची नावे असून आठ जखमींची नावे समजू शकली नाहीत.



