फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी २५ एप्रिलपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन

रत्नागिरी : सर्व फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी २५ एप्रिलपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये आंबा व काजू या फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.
सन २०२४-२५ करिता जिल्ह्यातील ३६ हजार ४६८ फळपीकधारक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे, परंतु, फळपिकांची ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाइल ॲपद्वारे केलेली नाही त्यांनी २५ एप्रिल २०२५ पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा दि. १२ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार ७/१२ उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही, याची फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.


