शृंगारतळी येथे लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा स्मृती दिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाचे उद्धारकर्ते, लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा ३१ वा स्मृतिदिन आणि आदरांजली सभा असा संयुक्त कार्यक्रम शृंगारतळी येथील गुहागर बाजार येथील लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात समाज शाखेचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते रामभाऊ बेंडल यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन आणि प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध ऊभे राहून लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर समाज शाखेच्या वतीने गेल्यावर्षी लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा स्मृती दिन हा संकल्प दिन म्हणून साजरा करण्याचा निश्चय केला होता. त्याप्रमाणे रामभाऊ बेंडल यांचे सुपुत्र राजेश बेंडल यांना आमदार म्हणून निवडून आणण्याचा आणि कुणबी समाजाचा हक्काचा आमदार निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला; परंतु राजेश बेंडल यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. असे असले तरी २०२९ मध्ये आमचा गरीबांचा, कुणबी समाजाचा हक्काचा आमदार म्हणून राजेश बेंडल यांनाच निवडून आणण्याचा निर्धार आणि संकल्प लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांच्या ३१ व्या स्मृती दिनी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीण या धर्म संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी पक्ष गुहागरचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर, मुस्लिम समाजाचे महमूद कादीर बारमारे गुरुजी, महेश कातकर, सुधीर टाणकर, विजय पागडे, सुनील रामाणे, अनंत गावडे, मंगेश मते, धनंजय शिगवण, गिरीश बारस्कर, चंद्रकांत पागडे, स्व.रामभाऊ बेंडल यांचे सुपुत्र, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, समाज शाखेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते, मुंबई शाखेचे सरचिटणीस कृष्णाजी वणे, समाज शाखेचे सल्लागार रामचंद्र हुमणे गुरुजी, समाज शाखेचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांनी लोकनेते रामभाऊ बेंडल यांना मनोगतातून आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज शाखेचे सचिव प्रदीप बेंडल यांनी केले. यावेळी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.


