मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

रत्नदुर्ग डिजिटल मीडिया इफेक्ट; गुहागर येथे तातडीने आरोग्य यंत्रणेचे पथक दाखल

आवश्यक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी : गुहागर परिसरातील नागरिकांनी मानले "रत्नदुर्ग डिजिटल मीडिया"चे आभार

गुहागर : “डास आणि उंदरांचा वाढता प्रादुर्भाव; गुहागरमध्ये नागरिक त्रस्त” हे वृत्त काल (५ डिसेंबर) “रत्नदुर्ग डिजिटल मीडियामध्ये” सर्वात आधी प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाने याची तात्काळ दखल घेतली. आज (६ डिसेंबर) सकाळी आरोग्य विभागाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. दोन आशा, एक आरोग्य सेवक आणि गुहागर तालुका आरोग्य अधिकारी या पथकाने संबंधित ठिकाणांची पाहणी करत आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. “रत्नदुर्ग डिजिटल मीडिया”च्या बातमीची तात्काळ गांभीर्याने दखल घेत आरोग्य विभागाने सतर्कता दाखवत तातडीने उचललेली पावले याबद्दल गुहागर परिसरातील नागरिकांनी “रत्नदुर्ग डिजिटल मीडिया” आणि आरोग्य विभागाचे आभार मानले.

“आम्हाला होत असलेल्या डास व उंदरांच्या त्रासाची दखल घेऊन “रत्नदुर्ग डिजिटल मीडिया”ने ही बाब सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचवली; ही कौतुकास्पद बाब आहे. ही माहिती मिळताच सुट्टीचा दिवस असून सुद्धा सकाळी लवकरच आरोग्य विभागाचे मलेरिया निर्मूलन अधिकारी व आरोग्य निरीक्षक, आरोग्य सेवक आणि आशा सेविका यांची १०-१२ जणांची टीम गावात हजर झाली. त्यांनी २४ तासांच्या आत तत्परतेने सर्वेक्षण करून, साचलेल्या नाल्यात डासांसाठी औषध टाकले व घरोघरी तपासणी केली. तसेच नियमित लक्ष ठेवून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील याची हमी दिली. नाल्यात पाणी तुंबून रहात आहे आणि सांडपाणी कुठून येत आहे, या संदर्भात नगरपरिषदेशी पत्रव्यवहार केला जाईल, असा विश्वास त्यांनी दिला, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली.

हे आहे पुढील नियोजन 

गटारातील पाण्यावरच्या डासांमुळे हत्ती रोगासारखा रोग होऊ शकतो अशी माहिती या पथकाने दिली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दर पाच दिवसांनी या गटाराच्या पाण्यात डास निर्मूलन करणारे औषध टाकण्यासाठी हे पथक येणार आहे. उंदरांच्या सुळसुळाटासंदर्भात गुहागर नगरपंचायतीला आणि तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात येणार आहे. तसेच या घटनेचा मूळ स्त्रोत कोणता आहे, त्याचाही शोध घेऊन त्यांनाही समज देऊन किंवा कारवाई करून अशा पद्धतीने नाले तुंबू नये यासाठी योजना करण्यात येणार आहे. वरिष्ठ पातळीपर्यंत ही बाब कळवली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!