विजेतेपदासाठी कुमार गटात सोलापूर-धाराशिव लढतील
५१ वी कुमार व मुली गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा : मुली गटात सांगली, ठाणे अंतिम लढत

अहिल्यानगर : ५१व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमार गटात गतविजेत्या धाराशिवची सोलापूरबरोबर अंतिम लढत होईल. मुली गटातून विजेतेपदासाठी गत उपविजेत्या सांगलीला ठाणेबरोबर झुंज द्यावी लागेल.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने अहिल्यानगर येथील श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बुऱ्हाणनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलींच्या गटात गतविजेत्या धाराशिवचे आव्हान ठाणे जिल्ह्याने ४०-२३ असे सहज संपुष्टात आणले. मध्यंतरासच त्यांनी १६-१० अशी निर्णायक आघाडी घेतली होती. ठाण्याच्या विजयात आक्रमक अक्षरा भोसले हिचा सिंहाचा वाटा आहे. तिने आपल्या धारदार आक्रमणात १६ गुण मिळवित १.१० मिनिटे पाळतीचा खेळ केला. तिला दीक्षा काटेकर (१.१७ मिनिटे संरक्षण व ६ गुण), वैष्णवी जाधव (१.००, १.५८ मिनिटे संरक्षण व ६ गुण) यांनीही अष्टपैलू खेळी करीत साथ दिली. उस्मानाबादच्या मैथिली पवारची (२.३० मिनिटे व १० गुण) अष्टपैलू खेळी एकाकी ठरली. श्रावणी गुंड व दुर्गा भोसले यांनी प्रत्येकी चार गडी बाद करीत लढत दिली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात गत उपविजेत्या सांगलीने सोलापूरला २६-२३ असे ३ गुण व १.५० मिनिटे राखून हरविले. मध्यंतराची १४-१० ही आघाडीच सांगलीला विजय मिळवून दिली. सांगलीकडून सानिया सुतार (१.०० मिनीटे व ८ गुण ) व सानिका चाफे (२.५० व १.३० मिनिटे नाबाद संरक्षण व २ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. सोलापूरच्या स्नेहा लामकाने (२.५०,१.०० मिनिटे व ८ गुण ) व प्राजक्ता बनसोडे (१.३० मिनिटे व ४ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले. तृतीय स्थानासाठी झालेल्या लघुत्तम आक्रमणाच्या सामन्यात धाराशिवने सोलापूरला २४ सेकंदांनी हरवले.
कुमार गटात सोलापूरने सांगलीस ‘ड्रीम’ गुणावर नमविले
कुमार गटात सोलापूरने सांगलीला ३९-३८ असे केवळ एका गुणाने नमवित अंतिम फेरी गाठली. नवीन नियमाचा एक ‘ड्रीम’ गुण सोलापूरच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. मध्यंतराच्या १८-२० अशा दोन गुणांच्या पिछाडीवरून सोलापूरने बाजी मारली. सोलापूरचे सिद्धार्थ माने देशमुखने (१.५० मि. व ८ गुण) अष्टपैलू खेळी केली. सुहाना आत्तार (१.३५ व ६ गुण) आणि अरमान शेख व शंभूराज चंदनशिव यांनी प्रत्येकी सहा गुण संघास मिळवून दिले. सांगलीच्या अथर्व पाटील (३.१५ व ८ गुण), श्री. दळवी (२ मिनिटे व ४ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या धाराशिवने पुण्यावर ३२-१९ अशी तीन गुणांनी मात केली. मध्यंतराची १२-१८ ही पिछाडीच पुण्यास महागात पडली. धाराशिवच्या विजयाचे शिल्पकार सोट्या वळवी ( १.००,१.१०मिनिटे व ८ गुण ), जितेंद्र वसावे (२.२० मिनिटे व २ गुण) व राज जाधव (२.०० मिनिटे व ६ गुण ) हे ठरले. पुण्याकडून शंकर यादव (१२ गुण) व आदेश पाटील (१.३०,२.०० मिनिटे व ४ गुण ) यांनी लढत दिली.
तृतीय स्थानासाठी झालेल्या लघुत्तम आक्रमणाच्या लढतीत सांगलीने पुण्यावर १.०३ मिनिटे राखून विजय मिळवला.



