आता हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा
रत्नागिरी देवगड हापूसला कुणीही बाजूला करू शकत नाही : पालकमंत्री सामंत

रत्नागिरी : भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील खवय्यांना आपल्या चवीने भुरळ घालणाऱ्या कोकणच्या हापूसवर आता गुजरातने दावा केला आहे. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी गुजरातने केली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची सध्या चिंता वाढली आहे. २०१८ मध्ये मिळालेल्या जीआय मानांकनामुळे कोकण हापूसला सुरक्षित बाजारपेठ मिळाली असतानाच नवीन दाव्यांमुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हापूस आंब्यावरही गुजरातने केलेला दाव्याची उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, “वलसाडचा येऊ दे किंवा कर्नाटकचा आंबा येऊ देत, काही फरक पडत नाही. रत्नागिरी, देवगडच्या हापूसला कुणीही बाजूला करू शकत नाही. केवळ वलसाड या नावाच्या आंब्यावरून देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होणार नाही. शेवटी ती आमची चव आहे आणि ती मधुरआहे, ती तशीच राहणार आहे. आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही हे जगाने सिद्ध केले आहे.”
कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर २०२२ मध्ये शिवनेरी हापूस आंबा नावाने भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला होता. त्यानंतर २०२३ मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला. त्यावर ३० ऑक्टोबरला पहिली सुनावणी झाली.
वलसाड हापूस मानांकनाच्या अर्जाला कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेने कडाडून विरोध केला. संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे म्हणाले, “कोकण हापूससाठी क्युआर कोड तयार केलाय. तरीही कोकण हापूसमध्ये भेसळ होते. आता वलसाड हापूसला मानांकन मिळाल्यास कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. आफ्रिकेतील मलावी देशातून येणाऱ्या मलावी हापूस नावावरही आम्ही आक्षेप घेतला. त्यानंतर मलावी आंबा नावाने विक्री होत आहे. कोकण हापूस हे कोकणातल्या चार जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या विशिष्ट आंब्यासाठीच आहे. ते आमच्यासाठीच राहिले पाहिजे. शिवनेरी हापूस, वलसाड हापूस आणि भविष्यातही असे अर्ज दाखल होण्याची शक्यता असलेल्या हापूसला आमचा विरोध असेल.”



