रत्ननगरी होणार धावनगरी
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वामधे धावपटू धावणार मराठी भाषेसाठी

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या वतीने नवीन पहिल्या पहिल्या रविवारी (४ जानेवारी) कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आयोजित केली आहे. हाफ मॅरेथॉनच्या या तिसऱ्या पर्वामधे सर्व धावपटू मराठी भाषेसाठी धावणार आहे. या स्पर्धेसाठी देशातील १२ राज्यांमधून जवळपास २२०० हून अधिक फिटनेस टुरिस्ट रत्ननगरीत दाखल होणार असल्याची माहिती सुवर्णसूर्य फाउंडेशन चे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी आज हॉटेल सी फॅन्समध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
२० डिसेंबर ही मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख असल्याचे नमूद करतानाच ते म्हणाले, “आजपर्यंत जगामध्ये कुठलीही अर्ध मॅरेथॉन कुठल्याही भाषेसाठी समर्पित केलेली नाही. हे शिवधनुष्य कोकणवासीय सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून पेलत आहेत. मॅरेथॉनदरम्यान जास्तीत जास्त मराठी संज्ञांचा वापर केला जाणार असून, जिथे अत्यावश्यक आहे तिथेच इंग्रजी भाषा असेल.”
संपूर्ण महाराष्ट्रात फिरून २५ पेक्षा जास्त जिल्ह्यामधील अनेक धावपटूना भेटून या उपक्रमाची माहिती दिली गेली आहे. या निमित्ताने ३० दिवसात जवळपास ४००० किमी प्रवास कोकण कोस्टल टीमने केला आहे.
राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग हे या उपक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत. तसेच बँक ऑफ इंडिया, ॲड प्लस H२O पार्टनर, सोर्जेन सॉक्स, एनर्जाल, जोशी फूड्स, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन आणि उदय सामंत फाउंडेशन हे देखील या उपक्रमाचे विशेष प्रायोजक आहेत.
या उपक्रमामध्ये भारताबाहेर राहणारे धावपटू आभासी पद्धतीने सहभागी होतील अशी माहिती यावेळी दिली गेली. आर्यक सोल्युशन्स या आयटी कंपनीच्या माध्यमातून यासाठी विशेष ॲप बनवण्यात येत आहे, याची माहिती यावेळी आर्यक सोल्युशन्सच्या प्रशांत आचार्य यांनी दिली.
२१ किमीचा एक दिशा मार्ग, आंब्याच्या आकाराचे मेडल, समुद्र किनारी सांगता, ९ गावांमधून जाणारा जैवविविधता अनुभवता येणारा मार्ग आणि समुद्र किनारी मिळणारा उकडीचा मोदक हे या उपक्रमाला सर्वांपेक्षा वेगळे बनवतात आणि यामुळेच ही कोकणवासीयांची मॅरेथॉन लोकप्रिय होते आहे. दरवर्षीप्रमाणे अंकिता पाटकर आणि त्यांची झुंबा टीम या मॅरेथॉन आधी झुंबा सेशन घेणार आहे. आयपॉपस्टार फेम राधिका भिडे हिने या मॅरेथॉनचे गाणे कंपोज केले आहे.
सुवर्णसूर्य फाउंडेशन “व्हिजन २०४७”वर काम करत आहे. पुढील २२ वर्षांत १ कोटी फिटनेस टुरिस्ट कोकणामध्ये फाउंडेशनच्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने आले पाहिजेत आणि किमान दोन हजार रुपये त्यांनी खर्च केला पाहिजे, जेणेकरून कोकणाची उलाढाल दोन हजार कोटींनी वाढेल असा मुख्य उद्देश असल्याचे प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या उपक्रमाविषयी ॲथलेटिकस असोसिएशनचे संदीप तावडे यांनी ज्या हेतूने ही मॅरेथॉन घेतली जाते तो हेतू अतिशय प्रामाणिक असल्याचे सांगितले.
रत्नागिरीतील स्थानिक नागरिकांनी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मुंबई रोड रनर्स या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक मॅरेथॉनचे ऑडिट होते आणि मॅरेथॉनला रेटिंग दिले जाते. त्या रेटिंगमध्ये कोकणवासीयांची कोकण कोस्टल मॅरेथॉन ही १ नंब वर आहे, अशी माहिती यावेळी प्रसाद देवस्थळी यांनी दिली.
स्थानिकांना ऑफलाईन नोंदणीची सुविधाही आनंद सागर अपार्टमेंट, मजगाव रोड इथे कोकण कोस्टल मॅरेथॉन ऑफिसमध्ये करण्यात आली आहे.
या पत्रकारपरिषदेसाठी ॲथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, ॲड. सचिन नाचणकर, आर्यक सोल्युशन्सचे प्रशांत आचार्य, डॉ. राज कवडे उपस्थित होते.


