आरोग्य विभागामार्फत जत्रेच्या माध्यमातून आरोग्य सेवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील जत्रोत्सव, यात्रा व इतर गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात आहेत. देवीहासोळ (ता. राजापू) येथे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री आर्यादुर्गा देवी जत्रोत्सवाच्या निमित्ताने विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक प्रमोद खेडकर, आरोग्य सेवक राम धनवे, आरोग्य सेविका गीतांजली चव्हाण, नीलेश विचारे तसेच आशा सेविका रेवती भोवड व नार्वेकर यांनी भाविकांना आवश्यक आरोग्य सेवा व तपासणी सुविधा उपलब्ध करून दिल्या.
शिबिरास श्री आर्यादुर्गा देवी संस्थानचे सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेत आरोग्य विभागाच्या या उपयुक्त उपक्रमाचे कौतुक केले.



