६१ वी पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
सोलापूर, मुंबई, पुणे, सांगली पुरुष गटात, तर महिला गटात धाराशिव, रत्नागिरी विजयी

बीड : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि बीड जिल्हा ॲम्युचर खो-खो संघटना यांच्यावतीने बीड येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू झालेल्या ६१ वी महिला-पुरुष राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या पहिल्या दिवशी साखळी सामन्यात बलाढ्य संघांनी विजयी सलामी दिली. पुरुष गटात सोलापूर, मुंबई, पुणे, सांगली, मुंबई उपनगर तर महिला गटात धाराशिव, पुणे, रत्नागिरी या संघानी विजयी वाटचाल सुरू ठेवली आहे.
बीड जिल्हा ॲम्युचर खो-खो संघटना यांच्यावतीने आयोजित या स्पर्धेत ४८ संघातील ७२० खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील सामने २१ डिसेंबरपर्यंत प्रकाशझोतामध्ये खेळविले जाणार आहेत. आज सकाळी मैदानाचे पूजन जेष्ठ संघटक तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. जनार्दन शेळके, खो-खो संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश शेळके, प्रा. राजेंद्र बरकसे, सचिव विजय जाहेर, बापूसाहेब तारुकर, योगेश सोळसे, नितीन येळवे, प्रफुल्ल हाटवटे, मनोज जोगदंड, अनिल शेळके यांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून करण्यात आले. या स्पर्धेसाठी ३२ सामनाधिकारी व १० तांत्रिक अधिकारी उपस्थित आहेत.
सकाळच्या सत्रात पुरुष गटात सोलापूरने नांदेडचा (45-20) पराभव केला. सोलापूरकडून अजित रणदिवेने २.४० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात ४ गुण मिळवले, तर प्रतीक शिंदेने 2.20 मिनिटे संरक्षण करत आक्रमणात ४ गुण मिळवले. जुबेर शेखने १.१० मीनिटे संरक्षण करून आक्रमणात १० गुणांची कमाई केली.
मुंबईने हिंगोलीचा (56-8) सहज पराभव केला. मुंबईकडून हितेश आग्रेने नाबाद 2.20 मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ६ गुण, सम्यक जाधवने 1.46 मिनिटे संरक्षण करीत आक्रमणात २ गुणांची कमाई केली. वेदांत देसाईने 1.50 मि. संरक्षण करतानाच आक्रमणात ४ गुण मिळवले.
पुण्याने छत्रपती संभाजीनगरचा (53-18) पराभव केला. पुणे संघाकडून प्रतीक वाईकरने 3.20 मि. संरक्षण करत आक्रमणात २ गुण, शुभम थोरातने 2.20 मिनिटे संरक्षण तर अथर्व दहाणेने 2.50 मिनिटे संरक्षण केले. दरम्यान, पुरूष गटातील उर्वरीत सामन्याचे निकाल असे ः सांगलीने बीडचा (40-20) पराभव केला. मुंबई उपनगरने सिंधुदुर्गचा (46-22) पराभव केला. धाराशिव संघाने लातूरचा (67-12) मोठ्या फरकाने पराभूत केले.
महिला गटातील सामन्यात धाराशिवने परभणीचा (57-10) पराभव केला. धाराशिवकडून जान्हवी पेठेने 3.20 मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १० गुण मिळवले. प्रणालीने 3.10 मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ६ गुण तर संध्या सुरवसेने 3.10 मिनिटे संरक्षण करून ८ गुणांची कमाई केली. दुसऱ्या सामन्यात पुण्याने सिंधुदुर्गचा (55-12) सहज पराभव केला. पुणे संघाकडून साक्षी करेने ३ मिनिटे संरक्षण व २ गुण, दिपाली राठोडने नाबाद दोन्ही डावात अनुक्रमे 1.30 व 2.20 मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ८ गुण मिळवले. भाग्यश्री बडेने २ मिनिट संरक्षण करताना आक्रमणात १० गुण मिळवले. सिंधुदुर्ग संघाकडून सानिया पालेकरने आक्रमणात ४ गुण मिळवले.
रत्नागिरीने छत्रपती संभाजी नगरवर (42-14) मात केली. रत्नागिरी संघाकडून पायल पवार (२.३० मिनिटे संरक्षण, ४ गुण), रिध्दी चव्हाण (२.२० मि. संरक्षण), सायली कर्लेकर (२.३० मिनिटे), अपेक्षा सुतार (२.२० मि. संरक्षण व ४ गुण), सायली कर्लेकरने (2.30 मि. संरक्षण व २ गुण), ऐश्वर्या सावंत (२ मिनिट संरक्षण व ४ गुण), वैष्णवी फुटक (८ गुण) यांनी चांगला खेळ केला. संभाजीनगर संघाकडून कोमल भागवत ने 1.10 मिनिटे संरक्षण केले. महिला गटातील उर्वरीत सामन्यातील निकाल असे ः सांगलीने जळगावचा (42-2) पराभव केला. सोलापूरने हिंगोलीवर सहज मात केली. महाराष्ट्र खो-खो संघटनेच्यावतीने पंच मंडळ अध्यक्ष सुधाकर राऊळ आणि पंच मंडळ सचिव प्रशांत पाटणकर, सहपंचप्रमुख नानासाहेब झांबरे उपस्थित आहेत.
आंतराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग
आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक विजेती भारतीय संघाची कर्णधार बीडची खेळाडू प्रियंका इंगळे (पुणे), अश्विनी शिंदे (धाराशिव),तर भारताचा कर्णधार प्रतिक वाईकर (पुणे), सुयश गरगटे (पुणे), अनिकेत पोटे (मुंबई उपनगर) असे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू यामध्ये सहभागी झालेले आहेत.


