मुख्य बातमी

मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम: दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६’ अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील नागरिकांना येत्या २६ ऑक्टोबरपर्यंत आपले दावे व हरकती दाखल करता येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली आहे.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत होती. मात्र, निवडणूक आयोगाने परिपत्रकान्वये या कालावधीत वाढ करून ती २६ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. दावे व हरकती निकाली काढणे आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या दिनांकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर या कालावधीत दावे-हरकती निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी पूर्वी निश्चित केल्याप्रमाणेच १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.

‘बीएलओ ॲप’वर अतिरिक्त कागदपत्रे जोडण्याची सुविधा

प्रारूप मतदार यादीतील ज्या मतदारांना मागील SIR मधील नोंदींशी जुळवणी न झाल्यामुळे (No Mapping) किंवा जुळवणी होऊनही तार्किक विसंगती (Logical Discrepancy) आढळल्याने नोटिसा प्राप्त झाल्या आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (BLO) सादर करावयाची आहेत. आयोगाने विहित केलेल्या कागदपत्रांपैकी पुरावा उपलब्ध नसल्यास मतदार अन्य कोणतेही वैध कागदपत्र अथवा दस्तऐवज सादर करू शकतात. याकरिता निवडणूक आयोगाकडून विहित १३ कागदपत्रांव्यतिरिक्त “Any other Documents” हा पर्याय ‘BLO App’ वर नव्याने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मतदारांनी आपल्या नोंदी तपासून घेण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव, पत्ता, वय आणि जन्मतारीख यांसारख्या सर्व तपशिलांची खातरजमा करून घ्यावी. नोंदींमध्ये काही दुरुस्ती आवश्यक असल्यास विहित नमुन्यात ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करावा. या सुविधेचा लाभ घेऊन नवमतदारांनी तसेच प्रारूप मतदार यादीत अद्याप नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी आणि अंतिम मतदार यादीत आपले नाव सुनिश्चित करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मतदार नोंदणी आणि यादीतील तपशील तपासण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा किंवा ‘ECINet’ या मोबाईल ॲपचा वापर करता येईल. तसेच ऑफलाईन पद्धतीने संबंधित तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय अथवा स्थानिक बीएलओ (BLO) यांच्याशी संपर्क साधून नागरिकांना आपले अर्ज सादर करता येतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!