कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
दारिद्र्य रेषेखालील भूमीहीन कुटुंबाला जमीन; पात्र अर्जदारांनी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : अनु.जाती व नवबौद्ध घटकाच्या दारिद्र्य रेषेखालील भूमीहीन कुटुंबाला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे. इच्छुक पात्र अर्जदाराने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबांव, रत्नागिरी यांच्याकडे संपर्क साधून अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत ४ एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन किंमत कमाल ५ लाख रुपये प्रती एकर किंवा २ एकर ओलीताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल ८ लाख रुपये प्रती एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनु. जाती व नवबौद्ध घटकातील असावा, लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील भूमीहीन असावा, लाभार्थीचे किमान वय १८ ते ६० वर्षे असणे गरजेचे आहे. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील भूमीहीन परित्यक्त्या स्त्रिया, दारिद्रय रेषेखालील भूमीहीन विधवा स्त्रिया, अनु.जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनु. जातीचे अत्याचारग्रस्त निवडीचे प्राधान्यक्रम आहेत.


