चिपळूणमधील सर्वात लांब उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू
मार्चपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता

चिपळूण : शहरातील गेली अनेक वर्षे चर्चेत असलेल्या सर्वात लांब उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. येत्या मार्चपर्यंत पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक कारणांमुळे या उड्डाणपुलाचे काम रेंगाळले होते. मध्यंतरी बहाद्दूरशेख चौकाच्या दरम्याने या उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामाचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे हा पुल चर्चेत आला होता व त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहराचा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. उड्डाणपुलाच्या कामाला सध्या चांगला वेग आला आहे. येत्या मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेकेदार कंपनीने निश्चित केले असून त्या दृष्टीने काम युद्धपातळीवर सुरू आहे.
बहादूरशेख चौक ते अतिथी हॉटेलपर्यंत हा उड्डाणपूल उभारला जात आहे. सुरुवातीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूल बांधण्याची योजना होती. मात्र, उभारणीदरम्यानच बहादूरशेख चौक येथे संरचना कोसळल्याने मोठा अडथळा निर्माण झाला. घटनेनंतर हा प्रकल्प पारंपरिक पद्धतीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुसार जुन्या पिलरशेजारी नवीन पिलर उभे करत काम पुन्हा सुरू करण्यात आले. सध्या बहुतांश पिलरचे काम पूर्ण झालं असून गर्डर बसवण्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी गर्डर चढवले गेले आहेत, त्या भागात स्लॅब घालण्याची तयारी सुरू आहे. रावतळे परिसरातील स्लॅबचे काम तर पूर्ण झाले आहे.पुल सुरू झाल्यानंतर चिपळूण शहरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या घटेल, अशी अपेक्षा आहे.


