जिल्ह्यात कुष्ठरोग मोहीम यशस्वी; २२ कुष्ठरुग्ण आढळले

रत्नागिरी : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कुष्ठरुग्ण शोध अभियानात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी मिळून एकूण सुमारे १४ लाख ९३ हजार ५४८ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ८४४४ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी अंतिम निदान झालेले २२ कुष्ठरुग्ण आढळले असून त्यांच्यावर बहुविध औषोधोपचार सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.परवेज पटेल यांनी दिली आहे.

मोहीम यशस्वी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी मोहिमेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
सन २०२७ पर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी अर्थात “शून्य कुष्ठरोग प्रसार” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले.
मोहीम संपली असल, तरी ही तपासणी सर्व आरोग्य केंद्रात वर्षभर सुरू असणार आहे. त्यामुळे त्वचेवर फिकट किंवा लालसर, बधिर, संवेदनाहीन एक किंवा अनेक चट्टे असणे, त्वचा तेलकट किंवा गाठीदार होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, तळहात व तळपायावर मुंग्या येणे, हात व पायाची बोटे वाकडी होणे अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी ,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
कुष्ठरुग्ण सापडलेले तालुकानिहाय आकडेवारी अशी : चिपळूण – ६, रत्नागिरी – ६, संगमेश्वर – ०, लांजा – ३, राजापूर – ४, खेड – ०,मंडणगड – २, गुहागर – ०, दापोली – १, एकूण रुग्ण संख्या २२.



