श्री क्षेत्र टेरव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

चिपळूण : रूढी- परंपरेनुसार शतक पार करणाऱ्या तालुक्यातील श्री क्षेत्र टेरव येथील हनुमान मंदिरात पौष शु. पंचमी शके १९४७ म्हणजेच २५ डिसेंबर रोजी सकाळी घटस्थापना करून विधिवत वीणापूजन करून वीणा चढवून हरिनाम सप्ताह सोहळ्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
परमेश्वराचे ठायी चित्त स्थिर होण्यास भजन, कीर्तन, हरिपाठ या सारखे अन्य साधन नाही. भजन कीर्तनामुळे दिवसेनदिवस श्रद्धा बळकट होऊन भक्तांचे मन हरिनामात रमू लागते व संसाराची झळ कमी होऊन मन प्रसन्न राहते व खऱ्या सुखाचे अनुभव येवू लागतात असे संताचे सांगणे आहे. वारकरी सांप्रदायाच्या परंपरेनुसार काकड आरती, संध्याकाळी हरिपाठ व त्या नंतर नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनाचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री हरी जागर करण्यात येईल. हरिनाम सप्ताहच्या या कार्यक्रमात समस्त ग्रामस्थ-भाविक आनंदाने सहभागी होऊन अखंड सेवा अर्पण करणार आहेत.
सप्ताहाची सांगता पौष शु. (द्वादशी) १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी काल्याच्या कीर्तनाने करण्यात येईल. तसेच दुपारी १२ ते १ या वेळेत हंडी फोडून काला करण्यात येईल व घट हालवून विधीवत पूजा करून वीणा उतरविला जाईल. काल्याचे कीर्तन झाल्यावर दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल.
सर्व ग्रामस्थ, भाविक, बंधू-भगिनीनी या उत्सवात सहभागी होऊन नामज्ञान यज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त टेरव ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.



