पटवर्धन हायस्कूलमध्ये कला (चित्रकला) कार्यानुभव व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन

रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये कला (चित्रकला) व कार्यानुभव विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन २७ डिसेंबर रोजी शाळेच्या कॅप्टन ठाकूर सभागृहात उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दि न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरीचे कार्यवाह दिलीप भातडे, कमर्शियल आर्टिस्ट आणि शाळेचे माजी विद्यार्थी सुजय कांबळे उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध चित्रकार अनुजा कानिटकर यांनी व्यक्तिचित्र रेखाटनाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमास भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील कीर, पालक प्रतिनिधी श्री. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
चित्रकला प्रदर्शनाच्या मांडणीचे नेतृत्व विभाग प्रमुख मुग्धा पाध्ये व उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर यांनी केले. कार्यानुभव विभाग प्रमुख श्रीमती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. धामापूरकर, श्रीमती भाटकर, श्रीमती गुरव, श्री. राठोड तसेच विद्यार्थी यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय श्री. गोरे, श्री. वैद्य, श्री. दामले, श्री. पाडळकर यांचे सहकार्य लाभले. अकरावी-बारावी विभाग प्रमुख मानसी चव्हाण व श्रीमती नागवेकर यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
या प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली एकूण एक हजारपेक्षा अधिक चित्रे प्रदर्शित करण्यात आली असून कार्यानुभव विभागाच्या २०० ते २५० विविध वस्तू आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे रांगोळी प्रदर्शन देखील विशेष आकर्षण ठरले. रांगोळी प्रदर्शनाची जबाबदारी श्रीमती गांधी, श्रीमती शेट्ये व श्रीमती तेंडुलकर यांनी समर्थपणे पार पाडली.
कला कार्यानुभव रांगोळी प्रदर्शनास भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा नमिता कीर, माजी कार्यवाह दादा वणजू, संस्थेचे विश्वस्त विनायक हातखंबकर तसेच माजी खजिनदार नचिकेत जोशी या मान्यवरांनी प्रदर्शनास भेट दिली. तसेच आजी-माजी संस्था पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.
आज (२९ डिसेंबर) माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाडे यांनी या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले व शाळेच्या उपक्रमाचे अभिनंदन केले.
कला कार्यानुभव व रांगोळी प्रदर्शनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले असून पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



