पावसाळ्यातील पुरस्थितीच्या अनुषंगाने पुरग्रस्त नागरिक व व्यापारी यांची २ मे रोजी सभा
पूरग्रस्त नागरिक व व्यापारी यांना पावसाळ्यात स्थलांतरणाचे आदेश देण्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना

राजापूर : शहरात दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीच्या अनुषंगाने पुनर्वसन योजनाही शासनाकडून राबवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी हंगामात पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे आदेश प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. त्या अनुषंगाने २ मे रोजी राजापूर शहरातील पुरग्रस्त नागरिक व व्यापारी यांची सभा राजापूर नगर पालिकेने आयोजित केली आहे. तसे पत्र राजापूर नगर पालिका प्रशासनाने पुरग्रस्त नागरिक व व्यापारी यांना दिले आहे.
या पत्रामध्ये मुख्याधिकारी यांनी मान्सून पूर्वतयारी २०२५ चे अनुषंगाने ही बैठक आयोजित केली असल्याचे नमूद करत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी भरून रहिवासी नागरिक, व्यावसायिकांना पुराच्या पाण्यापासून धोका निर्माण होत असतो. पुढील पावसाळी हंगाम विचारात घेता संभाव्य पुराचा धोका टाळण्याच्या दृष्टीने पूररेषेत येणारे सर्व रहिवासी नागरिक व व्यापारी वर्गाची बैठक उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, राजापूर यांच्या अध्यक्षतेखाली २ मे रोजी सांयकाळी ५ वाजता नगर पालिका कार्यालयीन इमारतीमधील ‘बॅ. नाथ पै” सभागृहात आयोजित केल्याची माहिती दिली आहे.
या दिनांकास व वेळेत न चुकता बैठकीला उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे आणि नगर पालिकेला सहकार्य करावे, असेही आवाहन या पत्राद्वारे राजापूर नगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.



