मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर समुद्रात बुडालेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश

गुहागर : वर्षअखेरच्या सुट्ट्यांचा उत्साह आणि समुद्रातील मौज मजा लुटताना गुहागर समुद्रकिनारी मुंबईहून गुहागरात पर्यटनासाठी आलेल्या तरुणांपैकी तिघेजण बुडाले. यामध्ये एकाचा बुडून मृत्यू असून, दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. अमोल मुथिया (वय ४२, रा. मुंबई) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मुंबईहून आलेले पर्यटक गुहागर किनाऱ्यावर समुद्रात उतरले होते; मात्र काही समजण्यापूर्वीच समुद्राच्या जोरदार प्रवाहामुळे तिघे पर्यटक बुडू लागले. आरडाओरड होताच आजूबाजूला असलेल्या स्थानिकांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखले आणि कोणतीही सुरक्षा साधने नसताना थेट समुद्रात उड्या मारत बचावकार्य सुरू केले. जीव धोक्यात घालून त्यांनी तिघांना बाहेर काढले.

या घटनेत अमोल मुथिया यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्यांना तातडीने गुहागर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे किनाऱ्यावर शोककळा पसरली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वारंवार सूचना, फलक आणि इशारे देऊनही पर्यटक समुद्रातील धोक्यांकडे दुर्लक्ष करतात, यामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!