मुख्य बातमी

कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज; १५ जूनपासून विशेष ‘मान्सून वेळापत्रक’ लागू

रत्नागिरी : मान्सूनच्या काळात कोकण पट्टीतील मुसळधार पाऊस आणि अवघड भूभागाचे आव्हान लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड वाहतुकीसाठी व्यापक पूर्वतयारी केली आहे. संपूर्ण मार्गावर सुरक्षित रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत विशेष ‘मान्सून वेळापत्रक’ आणि विभागीय गती निर्बंध लागू करण्यात येणार आहे. गेल्या दशकभरात सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पावसाळ्यात दगड कोसळून कोकण रेल्वेच्या वाहतुकीत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही, अशी माहितीही प्रशासनाने दिली. यावर्षीच्या मान्सूनसाठी प्रमुख पूर्वतयारी केली आहे. यामध्ये भू-सुरक्षा आणि पायाभूत सुविधांचे बळकटीकरणावर भर देण्यात आला असून, माती आणि दगड कोसळू नये म्हणून आवश्यक ठिकाणी उतारांचे सपाटीकरण, सॉईल नेलिंग, रॉक बोल्टिंग आणि शॉटक्रिटिंगची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच गॅबियन भिंती, आधार भिंती आणि बोल्डर नेटिंग (जाळ्या) उभारण्यात आल्या आहेत. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे मार्गालगतच्या नाल्यांची स्वच्छता व काँक्रीटीकरण करण्यात आले असून, संवेदनशील ठिकाणी पोर्टेबल पाणी उपसा पंप तैनात केले आहेत. रेल्वे मार्गाच्या चोवीस तास निगराणीसाठी ६५७ प्रशिक्षित जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेर्ना येथे एक्स्कॅव्हेटर्स (जेसीबी/पोक्लेन) तैनात आहेत. याशिवाय ९ प्रमुख ठिकाणी रेल्वे मेंटेनन्स वाहने (RMVs) आणि ७ केंद्रांवर टॉवर वॅगन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

वेर्ना येथे ‘अपघात मदत ट्रेन’ (ART) अवघ्या १५ मिनिटांत रवाना होण्याच्या तयारीत आहे. तसेच रत्नागिरी आणि वेर्ना येथे ऑपरेशन थिएटर सुविधा असलेल्या स्वयंचलित वैद्यकीय व्हॅन (ARMV) तैनात आहेत. मुसळधार पाऊस किंवा धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यास गाड्यांचा वेग ताशी ४० किमीपर्यंत मर्यादित ठेवण्याचे निर्देश लोको पायलट्सना देण्यात आले आहेत. रेल्वेमार्गावर पाण्याची पातळी १०० मिमी पेक्षा जास्त झाल्यास सुरक्षेसाठी रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केली जाईल आणि पाणी ओसरल्यावरच सुरू होईल.

आधुनिक तंत्रज्ञान आणि संपर्क यंत्रणा

पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यासाठी ९ स्थानकांवर पर्जन्यमापक, तर घोड, काळी, सावित्री आणि वशिष्ठी या प्रमुख नद्यांवरील पुलांवर पूर इशारा यंत्रणा कार्यरत आहेत. पनवल, मांडवी, जुवारी आणि शरावती या ४ मोठ्या पुलांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ‘वातवेगमापक’ बसवण्यात आले आहेत. तसेच लोको पायलट आणि स्टेशन मास्टर्सना वॉकी-टॉकी व व्हीएचएफ संच देण्यात आले आहेत. बोगद्यांमध्ये दर ४०० मीटरवर आणि मार्गावर दर १ किमीवर आपत्कालीन संपर्क सॉकेट्स (EMCs) बसवण्यात आले आहेत.

बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४/७ नियंत्रण कक्ष कार्यरत राहतील. सर्व ७२ स्थानकांवरील सीसीटीव्हीवर स्टेशन मास्तर कार्यालय आणि आरपीएफ चौक्यांमधून देखरेख ठेवली जाईल. त्याचप्रमाणे भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सातत्याने एसएमएस अलर्ट पाठवले जातील. ६ प्रमुख स्थानकांवर वैद्यकीय पथके तैनात असून सर्व गाड्यांच्या पॅन्ट्री कारमध्ये प्रथमोपचार पेट्या उपलब्ध आहेत.

पावसाळ्याच्या काळात प्रवाशांनी आपल्या ट्रेनच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यासाठी www.konkanrailway.com या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!