मच्छिमारांसाठी अपघात गट विमा, नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म नोंदणी कॅम्प १३ जून रोजी

रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांसाठी पावसाळी बंदी कालावधीचे औचित्य साधून अपघात गट विमा (GAIS) व नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP) नोंदणी कॅम्प १३ जून रोजी सकाळी १० वाजता जयगड मच्छिमार सहकारी संस्था, जयगड आणि कालिका मंदिर, काळबादेवी या ठिकाणी घेण्यात येत आहेत. या बंदी कालावधीत सर्व मच्छिमार, मासळी विक्रेते, मत्स्य व्यावसायिकांनी आपल्या कुटुंबातील १८ ते ७० वयोगटातील सदस्यांची दोन्ही योजनेत मोफत नोंद करून घ्यावी. जेणेकरून इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यास पात्र व्हाल, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आ. द. पालव यांनी केले आहे.
आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, वारसाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक आहेत. नौकेवरील परराज्यातील खलाशी तसेच इतर मत्स्यव्यवसायातील इतर कामगारांची देखील नोंद करणे आवश्यक आहे. कुटुंबातील एका व्यक्तीने सर्वांची कागदपत्रे सोबत आणून नोंदणी करू शकता.



