अंतरा फाऊंडेशनतर्फे दाभळवाडी (आंबेड बु.) शाळेला संगणक भेट

संगमेश्वर : रत्नागिरीतील अंतरा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जि.प. शाळा क्र. ४ दाभळवाडी, आंबेड बु. शाळेतील विद्यार्थ्यांना आयसीटी (ICT) विषयाच्या अध्ययनासाठी संगणक उपलब्ध करून देण्यात आला.
२१ वे शतक संगणकाचे आहे; मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी सुविधांच्या अनुपलब्धतेमुळे काही प्रमाणात मागे पडतात. अनेक शाळांमध्ये संगणक संच नादुरुस्त अवस्थेत असल्याने शिक्षकांनादेखील ऑनलाईन कामांच्या पूर्ततेसाठी मोबाईलवर कसरत करावी लागते. याच धर्तीवर ‘अंतरा फाऊंडेशन रत्नागिरी’च्या अध्यक्षा सौ. नुपुरा मुळ्ये यांनी ग्रामीण भागातील जि.प. शाळांसाठी उपलब्ध देणगीतून संगणक संच देण्याचा निर्धार केला असून त्यातूनच दाभळवाडी, आंबेड बु. शाळेला संगणक संच भेट स्वरूपात देण्यात आला आहे.
यावेळी अंतरा फाऊंडेशन रत्नागिरीचे खजिनदार आणि आंबेड गावचे मानकरी उन्मेष मुळ्ये यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत संगणकाचा सुयोग्य वापर करून गुणवंत होण्याची प्रेरणा दिली. केवळ एक संगणक संच देऊन विकास होईल अशी अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही, जेव्हा जेव्हा सहकार्याची आवश्यकता असेल त्यावेळी फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन त्यांनी उपस्थितांना दिले.
फाऊंडेशनचे सचिव राजेश आंबेकर यांनी उत्तम प्रकारे सहकार्य करत विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती पुरवली. भाजयुमो जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. पवार राज्यस्तरावर ‘निपुण महाराष्ट्र’ अंतर्गत वाचन, लेखन, साहित्य निर्मितीमध्ये काम करत आहेत. शाळेची विद्यार्थिनी प्रणाली भोसले हीची लंगडी खेळासाठी तालुका स्तरावर निवड झाली आहे. शाळेचे विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वजण आपल्या शाळेचा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध आहेत.
या कार्यक्रमासाठी अंतरा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ. सरिता आंबेकर, सदस्या सौ. अपर्णा शिगवण, ग्रुप ग्रा.पं. उपसरपंच शोएब भाटकर, ग्रा.पं. सदस्या सौ. साक्षी शिगवण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज गुरव, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ हरिश्चंद्र गुरव, विनोद भडेकर, दीपक गुरव, सौ. पवार, शिक्षक श्री. देवरे, अंगणवाडी सेविका सौ. सरिता गुरव, सौ. विनिता टाकळे, समस्त पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.



