खेडमध्ये सामाजिक समता मार्चचे जंगी स्वागत करणार : सुशांत सकपाळ

गुहागर (संदेश कदम) : १३ नोव्हेंबर रोजी आयोजित सामाजिक समता मार्चचे खेडमध्ये जंगी स्वागत करण्यात येणार असून, त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने तालुकास्तरावर नियोजन बैठक घेऊन गावागावांत तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुका अध्यक्ष बाबाराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत स्वागताची रूपरेषा, कार्यकर्त्यांची उपस्थिती, मार्गरचना, जनजागृती आणि वाहन व्यवस्थेचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) कोकण प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष सुशांत सकपाळ यांनी दिली.
या समता मार्चमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, सीमा आठवले, युवा नेते जीत आठवले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सरचिटणीस गौतम सोनावणे, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, सरचिटणीस सी. आर. कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खेड शहरातील जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मार्चचे स्वागत करण्याचे नियोजन असून, तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष श्री. सकपाळ यांनी केले.



