मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापुरातील नाट्यसंयोजक विजय कुबडे यांचे निधन

राजापूर : शहरातील खडपेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक व हनुमान मंडळ खडपेवाडीचे माजी अध्यक्ष विजय उर्फ बंड्या रघुनाथ कुबडे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दीर्घ आजाराने सोमवारी मध्यरात्री निधन झाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ते नाट्यसंयोजक म्हणून परिचित होते.

ते जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये होते. विविध पंचायत समित्यांमध्ये त्यांनी अधिकारीपदावर काम केले होते. मात्र या सेवेत असतानाच ते राजापूरच्या विविध संस्थावर कार्यरत होते. युवक क्रीडा मंडळ, धूतपापेश्वर संस्थान, स्वाभिमान राजापूर अशा अनेक संस्थामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. शासकीय सेवेतून निवृत्तीनंतर काही काळानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून त्या माध्यमातून जनसेवेची कास धरली होती.

गेले काही काळ ते आजारी होते. रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने कुटुंबियांनी त्यांना राजापुरातील निवासस्थानी आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन दिवसांनी सोमवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालविली. मंगळवारी सकाळी त्यांच्यावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. स्मशानभूमीतील शोकसभेत साहित्यिक मदन हजेरी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

विजय कुबडे यांच्या निधनाने येथील नाट्य चळवळीची अपरिमित हानी झाल्याची प्रतिक्रिया येथील माजी नगरसेवक व अभिनेते जितेंद्र मालपेकर यांनी व्यक्त केली. कै. कुबडे यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, दोन विवाहित कन्या, सून, जावई, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!