मुख्य बातमी

प्रिंटेड दिव्यांग प्रमाणपत्रधारकांना ऑनलाईन युडी आयडी बंधनकारक

१५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी कालावधीत तालुकानिहाय विशेष शिबिरे

रत्नागिरी : ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे आरोग्य विभागाकडील जुन्या ऑफलाईन हस्तलिखित किंवा प्रिंटेड दिव्यांग प्रमाणपत्रे आहेत, त्यांनी संगणक प्रणालीद्वारे युनिक डिसॲबिलिटी आयडी (युडी आयडी) ऑनलाईन काढणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्ह्यात १५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत तालुकानिहाय विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे दिली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या १५ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानात वाढ करून ते २५०० रुपये इतके करण्यात आले आहे. या वाढीव अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्याच्या नावासमोर युनिक डिसॲबिलिटी आयडी अपलोड असणे आवश्यक आहे.

तालुकानिहाय होणारी युडीआयडी शिबिर अशी : १५ जानेवारी रोजी दापोली तालुक्यात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता उपजिल्हा रुग्णालय, दापोली. १९ जानेवारी रोजी गुहागर तालुक्यात सकाळी १० ते दुपारी २ वाजता ग्रामीण रुग्णालय, गुहागर. २० जानेवारी रोजी खेड तालुक्यात सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी. २२ जानेवारी रोजी लांजा तालुक्यात सकाळी १० ते दुपारी २ वाजता तहसीलदार कार्यालय. लांजा (सभागृह). २७ जानेवारी रोजी चिपळूण तालुक्यात सकाळी १० ते दुपारी २ वाजता उपजिल्हा रुग्णालय कामथे. २९ जानेवारी रोजी मंडणगड तालुक्यात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता ग्रामीण रुग्णालय, मंडणगड. ३ फेब्रुवारी रोजी राजापूर तालुक्यात सकाळी १० ते दुपारी २ वाजता ग्रामीण रुग्णालय राजापूर. ५ फेब्रुवारी रोजी संगमेश्वर तालुक्यात सकाळी १० ते दुपारी २ वाजता ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी तालुक्यात दर बुधवार व शुक्रवारी सकाळी ९.३० ते दुपारी २ यावेळेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेचे अर्थसहाय्य मिळते; परंतु अद्यापही युनिक डिसॲबिलिटी आयडी नाही अशा लाभार्थ्यांनी शिबिराच्या तारखेपूर्वी आवश्यक त्या कागदपत्रासह युनिक डिसॲबिलिटी आयडी काढण्यासाठी जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार केंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयातील संगणक ऑपरेटर यांच्यामार्फत https://swavlambancard.gov.in या वेबलिंकवर आवश्यक त्या माहितीसह ऑनलाईन अर्ज दिव्यांग लाभार्थ्यांचे नातेवाईक/हितचिंतक यांच्यामार्फत आपल्या तालुक्यातील शिबिराच्या तारीखेपूर्वी करावा जेणेकरून शिबिराच्या दिवशी ऑनलाईन अर्ज करण्याचा वेळ वाचेल.

ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेचे अर्थसहाय्य मिळते; पंरतु त्यांच्याकडे युडी आयडी नाही अशा लाभार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन स्वत: चा युडी आयडी काढून घ्यावे व शासनास सहकार्य करावे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे युडी आयडी आहे; परंतु आधार ई-केव्हायसी केलेली नाही अशा व्यक्तींनी महा- ई- सेवा केंद्र किंवा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रही संपर्क साधून आधार ई-के व्हायसी करून घ्यावी व त्याची प्रत तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत जमा करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!