रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत थायरॉईड शस्त्रक्रिया
चार महिलांना नवजीवन : 'इएनटी' विभागाची उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरी : आरोग्यसेवेच्या क्षेत्रात रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने एक दिलासादायक आणि अभिमानास्पद कामगिरी नोंदवली आहे. कान-नाक-घसा (ENT) विभागामार्फत अत्यंत जटिल मानली जाणारी थायरॉईड शस्त्रक्रिया (Thyroid Surgery) यशस्वीरीत्या पार पाडत चार गरजू महिलांना नवजीवन देण्यात आले आहे.
कान-नाक-घसा विभाग प्रमुख तज्ज्ञ डॉ. सुनिता बागे यांच्या नेतृत्वाखाली श्रीम. प्राची गुरव (वय ४२, गणेशगुळे), श्रीम. जानकी गुप्ता (वय ५९, एमआयडीसी, रत्नागिरी), श्रीम. चंदादेवी शहा (वय ४२, कारवांची वाडी) आणि श्रीम. दिपश्री गोताड (वय ४३, जाकादेवी) या चार महिलांवर अत्यंत गुंतागुंतीची थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च येणारी ही शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात पूर्णतः मोफत करण्यात आली.
सदर रुग्ण गेल्या काही महिन्यांपासून गळ्यात सूज, श्वास घेण्यास त्रास, अन्न गिळताना अडचण तसेच आवाज बसणे अशा त्रासांनी ग्रस्त होत्या. तपासणीनंतर त्यांच्या थायरॉईड ग्रंथीत मोठी गाठ असल्याचे निदान झाले. अत्याधुनिक यंत्रसामग्री, कुशल वैद्यकीय पथक आणि डॉ. सुनिता बागे यांच्या कौशल्यपूर्ण नेतृत्वामुळे ही शस्त्रक्रिया कोणतीही गंभीर गुंतागुंत न होता यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्या उपचारानंतर चांगल्या प्रकृतीकडे वाटचाल करत आहेत.
या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. जमशीर शेख व डॉ. प्रियांका साळुंखे, शस्त्रक्रिया विभाग प्रभारी परिसेविका सौ. सुमन कोलापते तसेच परिचारिका सौ. भावना कुलकर्णी यांनी मोलाची भूमिका बजावली.
डॉ. सुनिता बागे यांनी सांगितले की, “अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये विशेष दक्षता आवश्यक असते. वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास थायरॉईडसारख्या आजारांवर प्रभावीपणे मात करता येते.”
रुग्णांच्या कुटुंबीयांनीही डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानत, “आर्थिक अडचणींमुळे आम्ही चिंतेत होतो, मात्र डॉक्टरांनी दिलेल्या धीरामुळे आणि योग्य उपचारांमुळे आमच्या रुग्णांची प्रकृती सुधारली,” असे सांगितले.
या उल्लेखनीय कार्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. बागे यांचे विशेष कौतुक करत, “अशा कठीण शस्त्रक्रिया शांतपणे व कौशल्याने पार पाडणे ही त्यांच्या उत्कृष्ट वैद्यकीय क्षमतेची साक्ष आहे,” असे गौरवोद्गार काढले. तसेच वैद्यकीय अधीक्षक व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
ग्रामीण व सर्वसामान्य रुग्णांना आपल्या जिल्ह्यातच दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होत असल्याने शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत असून, या यशामुळे रुग्णालयात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



