मुख्य बातमी

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील यांचे प्रतिपादन 

रत्नागिरी : तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही फक्त एका विभागाची जबाबदारी नसून, शासनाच्या सर्व विभागांनी सामूहिकपणे काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले.

आज जिल्हा परिषदेच्या लोकनेते शामराव पेजे सभागृहात मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व जिल्हा शासकीय रुग्णालय अंतर्गत तंबाखू नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू नियंत्रण कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ अनिरुध्द आठल्ये, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे सचिव तथा प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगळे उपस्थित होते.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप म्हणाले, युवकांच्यात व्यसन नियंत्रणाच्या बाबतीत जागरूकता पसरविणे गरजेचे आहे. याची सुरूवात सर्वांनी आपल्या मुलांपासून करून समाजातील इतर लोकांपर्यंत याबाबत काम करणे आवश्यक आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांच्या बाबतीत माहिती देऊन तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मानवाचे आयुर्मान दहा वर्षांनी कमी होत असल्याचे सांगितले. याचबरोबर गेल्या पंचवीस वर्षांत तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांच्या प्रसिध्दीमुळे तंबाखू सेवनाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी याबाबत अजून जागरूकता करण्याची गरज असल्याचे सांगितले.

कोटपा कायदा (सिगारेटस ॲन्ड ऑदर टोबॅको प्रॉटक्टस ॲक्ट २००३) आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कायदयाची अंमलबजावाणी करण्याऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायद्याच्या तरतुदींबाबत माहिती देऊन प्रभावीपणे कायद्याच्या पालनाची सुनिश्चिती करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कोटपा कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी अंमलबजावणी अधिकारी यांना कायद्यात तरतूद करण्यात आलेल्या जबाबदारींची व भूमिकांची माहिती करून देणे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!